क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी नुकतेच भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त चैत्यभूमीवर जाऊन अभिवादन केले. गेल्या वर्षी समीर वानखेडे एकटेच अभिवादनासाठी गेले होते, मात्र या वर्ष पत्नीसोबत आल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. यावेळी क्रांतीने सर्व आंबेडकर प्रेमींना महामानवाच्या १३२ व्या जयंती निमित्त शुभेच्छादेखील दिल्या. याआधी अनेकदा इथे अनेकदा येणे झाले पण १४ एप्रिलला मी पहिल्यांदाच आले आहे. आज मी छान नटून- थटून एक सून म्हणून आले आहे आणि मलाही सगळ्यांनीच अगदी खुल्या मनाने स्वीकारले आहे, असे क्रांतीनं म्हटलं.
यावेळी क्रांती रेडकरला समीर वानखेडे यांच्या राजकीय वाटचालीविषयी होणाऱ्या चर्चांबद्दलही विचारले आणि नेत्याची पत्नी व्हायला आवडेल का, असा विचारण्यात आले. त्यावर अभिनेत्री म्हणाली की, 'माझ्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी न ठरवता झाल्या आहेत. प्रत्येक गोष्टीला मी धाडसाने सामोरे गेले, कारण माझा नवरा कसा आहे हे मला माहीत आहे. पुढे जे काही ते निर्णय घेतील, मग भले ते सेवेत असतील किंवा नसतील त्यांचं जे ध्येय आहे की जनतेची सेवा केली पाहिजे, हे ते नक्कीच करतील. त्यांच्या या ध्येयात एक पत्नी म्हणून जो हातभार लावला पाहिजे तो एक पत्नी म्हणून मी नक्कीच लावेन.
चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन करायला आलेल्या समीर आणि क्रांती यांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यात समीर वानखेडेंनी आज सगळ्यांना नवीन भीम भक्त पाहायला मिळाला, असे म्हणत क्रांतीचे कौतुक केले. यावर प्रतिक्रिया देताना क्रांती म्हणाली की, 'मी भीम भक्त आधीपासून होते. पण आज यायची संधी मला मिळाली. समीरची पत्नी म्हणून मी या समाजात वावरते ही माझ्यासाठी फार अभिमानाची गोष्ट आहे.