Join us

अरे व्वा..! रिंकू राजगुरूला मराठी सिनेइंडस्ट्रीत काम करताना वाटतो आपलेपणा, वाचा सविस्तर

By तेजल गावडे | Published: May 28, 2021 8:00 AM

रिंकू राजगुरूने मराठी आणि हिंदी अशा दोन्ही सिनेइंडस्ट्रीत अभिनयाच्या जोरावर आपली छाप उमटविली आहे.

सैराट चित्रपट म्हटलं की डोळ्यासमोर येते ती आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू. या चित्रपटातून रिंकू राजगुरूने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. या चित्रपटातून एका रात्रीत ती लोकप्रिय झाली. या चित्रपटानंतर तिने कागर, मेकअप या मराठी चित्रपटात काम केले. त्यानंतर ती लारा दत्तासोबत हिंदी वेबसीरिज हंड्रेडमध्ये झळकली. तसेच ती आगामी काही हिंदी आणि मराठी प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे. तिला हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत आलेल्या अनुभवाबद्दल बोलताना मराठी चित्रपटसृष्टीत काम करताना आपलेपणा वाटल्याचे तिने सांगितले.

रिंकू राजगुरूने मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीत काम केले आहे. तिला दोन्हीकडे काम करताना काय फरक जाणवला, हे विचारल्यावर ती म्हणाली की, वेगळ्या भाषेत आणि वेगळ्या लोकांसोबत काम करायला खूप मजा येते. त्यांची काम करण्याची पद्धत खूप वेगळी असते. सेटवरील वातावरण ही खूप वेगळे असते. हिंदी भाषा आपली नसल्यामुळे तितका आपलेपणा वाटत नाही. याउलट मराठी इंडस्ट्रीत काम करताना आपलेपणा वाटतो. 

हिंदीत काम करताना भाषेची अडचण आली का, या प्रश्नावर रिंकूने सांगितले की, माझी हिंदी भाषा इतकी चांगली नाही. मी हंड्रेड वेबसीरिजमध्ये काम केले. तेव्हा मी साकारलेली नेत्रा पाटील ही महाराष्ट्रीयन मुलगी होती. त्यामुळे हिंदी-मराठी बोलणारे कॅरेक्टर होते. त्यामुळे तिथे भाषेची अडचण आली नाही. सतत हिंदीत काम करत राहीन.

रिंकू राजगुरूने लॉकडाउनमध्ये छूमंतर मराठी चित्रपटाचे लंडनमध्ये शूटिंग पूर्ण केले. तसेच तिने जस्टिस डिलिवर्ड या हिंदी वेबसीरिजचे मुंबईत शूटिंग पूर्ण केले. त्यामुळे लॉकडाउनमधील चित्रीकरणाच्या अनुभवाबद्दल तिने सांगितले की, नेहमीपेक्षा शूटिंगचा हा वेगळाच अनुभव होता. कोरोनाच्या संकटामुळे आता सेटवर कमी व मोजकी माणसे असायची. प्रत्येक जागा वारंवार सॅनिटाइज केली जात होती. सर्वजण मास्क घालून असायचे. सेटवर एकतरी डॉक्टर असायचे. आताची परिस्थिती पाहून अशीच काळजी घेतली पाहिजे असे वाटते.

टॅग्स :रिंकू राजगुरूसैराट 2