Join us

बालरंगभूमीवरील ‘व्यक्ती आणि वल्ली’ला लाभली दिग्गज कलाकारांची दाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2017 3:22 AM

​पुलंच्या लेखणीतून उतरलेल्या कित्येक व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. 'व्यक्ती आणि वल्ली' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकावर विविध ...

​पुलंच्या लेखणीतून उतरलेल्या कित्येक व्यक्तिरेखा आजही लोकांच्या मनात घर करून आहेत. 'व्यक्ती आणि वल्ली' या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकावर विविध कार्यक्रम तसेच नाटकदेखील सादर करण्यात आली आहे, मात्र बाल्ररंगभूमीवर पुलंच्या या विविध वल्लींना प्रथमच 'व्यक्ती आणि वल्ली' या नाटकाद्वारे सादर करण्यात आले. २४ ऑक्टोबर रोजी गडकरी रंगतायनला मोठ्या दिमाखात पार पडलेल्या या नाटकाच्या शुभारंभ प्रयोगाला मराठीतील दिग्गज कलाकारांची विशेष उपस्थिती लाभली. ज्यात उदय सबनीस, शिरीष लाटकर, मंगेश देसाई, अंगद म्हसकर, प्रदीप धवल, महेश केळुस्कर, अशोक समेळ, विजय गोखले, विघ्नेश जोशी, रमेश वाणी, सुप्रिया पाठारे, निरंजन कुलकर्णी, रमेश भाटकर  यांसारख्या कलाकार आणि मान्यवरांची उपस्थिती आकर्षणाचा विषय ठरली. बालकलाकारांनी साकारलेल्या अंतू बर्वा, भाऊ, सखाराम गटणे, नाथा कामत, नारायण यांसारख्या विविध पात्रांचा या सर्वांनी आस्वाद घेत, नाटकाला भरपूर शुभेच्छादेखील दिल्या.  गंधार कलासंस्था तसेच कोकण कला अकादमी प्रकाशित आणि अमृता प्रॉडक्शन निर्मित या नाटकाचे प्रा. मंदार टिल्लू यांनी दिग्दर्शन केले असून, बालरंगभूमीवरच्या 'व्यक्ती आणि वल्ली'च्या या पहिल्याच प्रयोगाला नाट्यरसिकांनीदेखील चांगलीच गर्दी केली होती. सुप्रसिध्द दिग्दर्शक विजू माने आणि अशोक नारकर या नाटकाचे निर्माते असून, प्रसिद्ध नेपथ्यकार प्रसाद वालावलकर यांचादेखील यात सहभाग आहे. विविध मालिका, चित्रपट आणि नाटकांमधून नावारूपास आलेले बालकलाकार, कैवल्य शिरीष लाटकर, अथर्व बेडेकर, स्वानंद शेळके, वेदांत आपटे, अद्वेय टिल्लू, स्वरा जोशी, यश विघ्नेश जोशी, सुमेध रमेश वाणी आदींची यात महत्वाची भूमिका आहे.शितल तळपदे यांची प्रकाश योजना या नाटकाला लाभली आहे. तसेच राजू आठवले आणि प्रशांत विचारे यांनी सहाय्यक दिग्दर्शकाची धुरा सांभाळली असून, या नाटकाला वैभव पटवर्धन यांचे पार्श्वसंगीत आणि प्रकाश निमकर यांची वेशभूषा लाभली आहे. शिवाय शशिकांत सकपाळ यांची रंगभूषा लाभली असून, प्रा. संतोष गावडे, अमोल आपटे, सुनिल जोशी ह्या तिकडींनी निर्मिती सूत्रधाराची धुरा सांभाळली आहे. तसेच बाळकृष्ण ओडेकर यांनी सहनिर्मितीचा कार्यभाग सांभाळला आहे.