मराठी-हिंदी मालिका आणि चित्रपटात विविध भूमिकांतून रसिकांच्या मनावर छाप पाडणारे अभिनेता यतिन कार्येकर यांची सोनी लिववर 'फुल टाईट' ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या वेब सीरिजला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. त्यानंतर ते आता आणखीन एका वेब सीरिजमध्ये झळकणार आहेत. 'स्वातंत्र्यवीर' असे या वेबसीरिजचे नाव असून ही वेब सीरिज स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर आधारीत आहेत. या वेब सीरिजमध्ये यतिन कार्येकर सावरकर यांच्या गुरूजींच्या भूमिकेत दिसणार आहेत.
टीव्ही मालिकांपेक्षा चित्रपट, जाहिराती व वेब सीरिज करण्याला जास्त प्राधान्य असल्याचे यतिन कार्येकर म्हणाले व त्यांनी पुढे सांगितले की, 'या माध्यमात काम करण्यासाठी खूप स्वातंत्र्य आहे. तसेच या सीरिजची स्क्रीप्ट आधीच मिळत असल्यामुळे ती भूमिका चांगल्यापद्धतीने साकारायला मदत होते. डिजिटल माध्यम जगभरात पोहचते. त्यामुळे हे खूप चांगले माध्यम आहे. ''फुल टु टाईट' वेब सीरिजमध्ये यतिन कार्येकर यांनी वडीलांची भूमिका साकारली आहे. या वेबसीरिजनंतर ते 'स्वातंत्र्यवीर' या वेब सीरिजमध्ये दिसणार आहेत. या वेब सीरिजचे दिग्दर्शन प्रवीण राजा कारळे यांनी केले असून निर्मिती प्रशांत दळवी व पराग पाटील यांनी केली आहे. ही वेब सीरिज १५ ऑगस्टला युट्युबवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'स्वातंत्र्यवीर' या वेबसीरिजबद्दल यतिन कार्येकर यांनी सांगितले की, 'स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल लोकांना या वेब सीरिजमधून जाणून घेता येणार आहे. या सीरिजमध्ये सावरकर यांच्या बालपणीच्या काळात शाळेतील गुरूजीच्या भूमिकेत दिसणार आहे. ही वेबसीरिजदेखील प्रेक्षकांना आवडेल अशी आशा आहे.'