Join us  

Ye Re Ye Re Pausa Movie Review : पाणी टंचाईचं भयाण वास्तव दर्शवणारा 'ये रे ये रे पावसा'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2022 2:58 PM

Ye Re Ye Re Re Pausa Movie Review: दुष्काळामुळं गावंच्या गावं ओस पडल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतं. या चित्रपटातही जलदुर्भिक्ष्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका गावाची कथा 'ये रे ये रे पावसा'मध्ये सादर करण्यात आली आहे.

कलाकार : छाया कदम, मिलिंद शिंदे, संदेश जाधव, चिन्मयी साळवी, विनायक पोतदार, आर्या आढाव, प्रदीप नवले, प्राजक्ता वाड्ये, वैभव जेऊघाले पाटील, हृषीकेश करळे, नकुल चौधरी, वैष्णवी रानमाळे, उत्कर्ष करळे, अचला पांचाळ, प्रज्ञा गोपाले, अनिल मोरेदिग्दर्शन : शफक खाननिर्मिती : शारीक खानस्टार - तीन स्टारचित्रपट परीक्षण - संजय घावरे

पाणी म्हणजे जीवन, पण जेव्हा पाणीच मिळनासं होतं तेव्हा करायचं तरी काय? असा प्रश्न आजही देशातील असंख्य गावकऱ्यांना सतावत आहे. महाराष्ट्रही याला अपवाद नाही. दुष्काळामुळं गावंच्या गावं ओस पडल्याचं चित्र बऱ्याच ठिकाणी पहायला मिळतं. या चित्रपटातही जलदुर्भिक्ष्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या एका गावाची कथा सादर करण्यात आली आहे. चित्रपटाचा विषय समाजातील वास्तव दाखवणारा असून, त्यातील दाहकता कमी होऊ नये यासाठी वास्तव लोकेशन्सवर शूट करण्यात आलं आहे. मनोरंजक मसाल्यांचा मोह टाळून दिग्दर्शिका शफक खान यांनी वास्तवदर्शी चित्र दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

कथानक : पाण्याचा दुष्काळ पडणाऱ्या एका गावातील ही गोष्ट आहे. हिंदू-मुस्लीम एकोप्यानं नांदणाऱ्या या गावातही आजूबाजूला सुरू असणाऱ्या दंगलीचा हळूहळू परिणाम होऊ लागतो. पाण्याच्या दुष्काळापासून अनभिज्ञ असणारी लहान मुलं आपल्याच मस्तीत जगत असतात. पाणी आटल्यानं शाळा बंद होते आणि गाव सोडण्याबाबत विचार सुरू होतो, तेव्हा मात्र या मुलांमध्ये चिंतेचं वातावरण पसरतं. सलमान खानचा फॅन असलेला सलमान नावाचा मुलगा एकदा भल्या पहाटे उठून पारावर जाऊन पाणी आणतो. त्यानंतर याच चांडाळ चौकडीतील एक मुलगा एक युक्ती काढतो. त्याला इतर मुलांची साथ लाभते आणि एक चमत्कार घडतो. त्यानंतर काय घडतं ते चित्रपटात पहायला मिळतं.

लेखन-दिग्दर्शन : चित्रपटाची कथा भूषण दळवींनी लिहिली असून, त्यांनीच शफक यांच्यासोबत पटकथालेखनही केलं आहे. चित्रपट लिखाणात थोडा फसल्यानं काही मुद्दे पटत नाहीत. पाण्याचा विषय यापूर्वी बऱ्याचदा आला आहे. चित्रपटाचा विषय खूप गंभीर असून, तो लहान मुलांच्या दृष्टिकोनातून मांडण्यात आला आहे. मोठी माणसं जिथं धर्मांध होऊन आपसांत भांडत असतात, तिथं कोणताही धर्म नसणाऱ्या पाण्यासाठी लहान मुलं कशाप्रकारे शक्कल लढवतात त्याचं चित्रण या चित्रपटात करण्यात आलं आहे. गावातील वातावरण निर्मितीही सुरेख झाली आहे. पटकथेची मांडणी उत्कंठावर्धक नसल्यानं आणि बऱ्याच उणीवा राहिल्यानं चित्रपट अधिक प्रभाव टाकण्यात यशस्वी होत नाही. पहिल्या दृश्यापासूनच लोकेशन्स तिथलं भयाण वास्तव दाखवतात. अंधश्रद्धा, हिंदू-मुस्लीम दंगल, आपसांतील भेदभाव, सरकारचं उदासीन धोरण, सरकारी कर्मचाऱ्यांची अनास्था, स्त्रियांची पाण्यासाठी वणवण, आटलेल्या विहिरी, बंद झालेल्या शाळा, गावकऱ्यांची तळमळ आणि लहानग्यांच्या अथक प्रयत्नांच्या माध्यमातून चित्रपटाचं कथानक उलगडत जातं. लहान मुलं एक युक्ती करतात इथपर्यंत ठीक आहे, पण रात्रीच्या वेळी शापित जागेवर जाण्याचं धाडस करतात आणि त्यांच्या वयापेक्षा कोणत्याही मोठ्या व्यक्तीच्या साथीशिवाय पाण्याचा प्रश्न सोडवतात हे तत्वत: पटत नाही. कॅमेरा, लोकेशन्स, पार्श्वसंगीत आणि काही प्रसंगानुरुप दृश्ये चांगली झाली आहेत. लव्ह ट्रॅकद्वारे ओसाड माळरानावर गुलाबी रंग उधळण्याचा छोटासा प्रयत्नही चांगला आहे.

अभिनय : सर्वच लहान मुलांचं कौतुक करावं लागेल. प्रत्येकानं आपलं काम चोख बजावलं असून, यासाठी दिग्दर्शिका शफक खान यांना पैकीच्या पैकी गुण द्यावे लागतील. विनायक पोतदारचा निरागसपणा भावतो. आर्या आढावनं सलमान खानच्या फॅनची भूमिका अगदी भाईजान शैलीत साकारली आहे. हृषीकेश करळेनंही अगदी सहजसुंदर अभिनय केला आहे. वैष्णवी रानमाळेची संवाद बोलण्याची शैली आकर्षित करते. नकुल चौधरीनं प्रयोगशील नाम्याच्या व्यक्तिरेखेला न्याय दिला आहे. वैभव पाटील आणि चिन्मयी साळवी यांचं आंखो ही आंखोंमध्ये होणारं प्रेम गुलाबी रंगाची हलकीशी छटा सादर करतं. छाया कदम यांनी अतशिय सहजपणे झुबैदा साकारली आहे. मिलिंद शिंदेनी आपल्या नेहमीच्याच शैलीत मोहम्मद सादर केला आहे. संदेश जाधवच्या रूपात कट्टर हिंदूवादी गजानन पहायला मिळतो. यांच्यासोबत इतर सर्वच कलाकारांची चांगलं काम केलं आहे.

सकारात्मक बाजू : वय कधीच कोणत्याही कामाच्या आड येत नाही. इच्छाशक्ती असेल तर लहान मुलंही अशक्यप्राय गोष्टी करू शकतात हे दाखवताना लहानग्यांना प्रोत्साहित करण्याचा विचार या चित्रपटात मांडण्यात आला आहे.

नकारात्मक बाजू : काही उणीवा राहिल्या असल्यानं क्लायमॅक्स आणि त्यापूर्वी लहान मुलांनी पाणी आणण्यासाठी केलेला प्रयत्न वास्तवदर्शी वाटत नाही. 

थोडक्यात : बऱ्याच त्रुटी राहिल्या असल्या तरी लहान मुलांनी केलेला प्रयत्न केवळ पाण्याचं दुर्भिक्ष्य असणाऱ्या भागांतीलच नव्हे, तर सर्वच ठिकाणच्या मुलांना प्रोत्साहीत करणारा आहे. त्यामुळं लहानांसोबत पालकांनीही हा चित्रपट एकदा पहायला हवा.