एकांकिका स्पर्धांच्या वर्तुळात मानाच्या समजल्या जाणाऱ्या 'अस्तित्व' आणि 'चारमित्र' कल्याण संयुक्त विद्यमाने आयोजित कै. श्री. "मु.ब.यंदे पुरस्कृत" बत्तीसाव्या 'कल्पना एक आविष्कार अनेक' या अभिनव एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत यंदा विषयाच्या वैविध्यपूर्ण मांडणीमुळे चुरस निर्माण झाली आहे. या स्पर्धेचे ३२ वे संयुक्त वर्ष आहे.
यंदाची ही स्पर्धा विशेष चर्चेत आहे ती संवेदनशील कवी,नाटककार,अभिनेते पियुष मिश्रा यांच्या ‘जब शहर हमारा सोता है’ या समकालीन विषयामुळे. या कल्पनेवर आधारित पाच एकांकिकांची अंतिम फेरी येत्या शनिवारी तेरा ऑक्टोबरला सकाळी साडेअकरा वाजल्यापासून कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिर इथे संपन्न होईल. या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच या स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई बाहेर होत असून नाट्यचळवळीचे नवे केंद्र असलेल्या कल्याणमध्ये ती होईल.
या स्पर्धेची प्राथमिक फेरी सहा ऑक्टोबरला पार पडली,प्राथमिक फेरीत वीस संघांनी सहभाग नोंदवला,त्यापैकी सतरा एकांकिका सादर झाल्या. प्राथमिक फेरीचे परीक्षण रमेश मोरे,गिरीश पतके,नीळकंठ कदम आणि रवींद्र लाखे या मान्यवरांनी केले.
नव्या पिढीला भावणारा,त्यांच्यातल्या स्वप्नाळू ,प्रेमळ भावनांना तरल शब्द देणारा पण बरोबरीने त्यांच्यातल्या अस्वस्थतेला नेमके धारदार शब्द रूप देणारा म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या लेखक,दिग्दर्शक,गीतकार, गायक, अभिनेता अर्थात अष्टपैलू पियुष मिश्रा यांचा कुठलीही प्रस्तावना नसलेला समकालीन ‘जब शहर हमारा सोता है’ हा विषय वरवरून सोप्पा वाटणारा पण सादर करायला कठीण असा असल्याची चर्चा सोशल मीडियात सुरु होती त्याचाच प्रत्यय प्राथमिक फेरीत आला.
या स्पर्धेत दरवर्षी महाविद्यालयीन रंगकर्मींबरोबरच हौशी तसेच व्यावसायिक रंगभूमीवरचे कलावंतही आपल्या सृजनशीलतेला वाव देण्यासाठी आवर्जून सहभागी होतात. यंदा प्राथमिकमध्येही अनेक व्यावसायिक रंगकर्मी सहभागी झाले होते.
एपिटोम थिएटर्स,मुंबईची स्वप्नील चव्हाण लिखित स्वप्नील टकले आणि गिरीश सावंत दिग्दर्शित ‘टाहो’, रंगभूमी कलाकार,मुंबईची चंद्रमणी किर्लोस्कर लिखित अभिजित मणचेकर दिग्दर्शित ‘कपाळमोक्ष’,उन्नती आर्ट्स,मुंबईची प्रमोद शेलार लिखित –दिग्दर्शित ‘भूत..मनातलं की....’, जिराफ थिएटर्सची राकेश जाधव लिखित-दिग्दर्शित ‘सरफिऱ्या‘ आणि दिशा थिएटर्स,ठाणेची दीपाली घोगे लिखित,ऋतूराज फडके दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या पाचही वेगेवगेळ्या प्रकृतीच्या एकांकिका अंतिम फेरीत दाखल झाल्या असून एकांकिका वर्तुळात अनेक पारितोषिक प्राप्त असलेल्या या तगड्या संघांमुळे यंदाच्या कल्पना एकची अंतिम फेरी चुरशीची ठरेल असा अंदाज आहे.