यंदाच्या वसंतोत्सवमध्ये संगीत मानापमानची मेजवानी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2017 3:06 PM
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘वसंतोत्सव’मध्ये यंदा ‘संगीत मानापमान’ नाटकाचा प्रयोग आणि ‘इंडियन ओशन’ रॉक बँड ही पर्वणी रसिकांना ...
डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानतर्फे आयोजित ‘वसंतोत्सव’मध्ये यंदा ‘संगीत मानापमान’ नाटकाचा प्रयोग आणि ‘इंडियन ओशन’ रॉक बँड ही पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. रसिक श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशातून २० ते २२ जानेवारी या कालावधीत होणारा न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेच्या मैदानावर होणारा वसंतोत्सव विनामूल्य असेल.डॉ. वसंतराव देशपांडे यांचे नातू आणि प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे यांनी मंगळवारी पत्रकतार परिषदेत ही माहिती दिली. ज्येष्ठ गायक पं. व्यंकटेश कुमार यांच्या गायनाने २० जानेवारी रोजी वसंतोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर संगीत रंगभूमीवरील नटसम्राट बालगंधर्व यांनी अजरामर केलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर लिखित ‘संगीत मानापमान’ नाटय़प्रयोग होणार असून त्यामध्ये राहुल देशपांडे आणि प्रियांका बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. प्रसिद्ध पाश्र्वगायिका रेखा भारद्वाज यांच्या गायनाने २१ जानेवारीच्या सत्राचा प्रारंभ होणार आहे. प्रसिद्ध बासरीवादक पं. रोणू मुजुमदार आणि राहुल देशपांडे यांचे गायन अशी फ्यूजन मैफल होणार आहे. किराणा घराण्याचे प्रसिद्ध गायक आनंद भाटे यांच्या गायनाने २२ जानेवारीच्या सत्राची सुरुवात होणार आहे. ‘इंडियन ओशन’ या रॉक बँडचा कलाविष्कार आणि ज्येष्ठ मोहनवीणावादक पं. विश्वमोहन भट्ट यांच्या फ्यूजनने महोत्सवाची सांगता होईल.ज्येष्ठ गायिका सुलभा ठकार आणि प्रसिद्ध ऑर्गनवादक राजीव परांजपे यांना यंदाचा डॉ. वसंतराव देशपांडे स्मृती सन्मान प्रदान केला जाणार आहे. प्रत्येकी ५१ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. युवा गायक श्रीपाद लिंबेकर यांना उदयोन्मुख कलाकार पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून २५ हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘वसंतोत्सव’साठीच्या विनामूल्य प्रवेशिका शनिवारपासून बालगंधर्व रंगमंदिर आणि पंडित फाम्र्स येथे मिळतील.