मनोरमा वागळे यांनी गंमत जम्मत, आम्ही दोघे राजा राणी, गडबड घोटाळा, घरजावई, आत्मविश्वास, उबंरठा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या होत्या. अनेक चित्रपटात आपल्याला त्यांना लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सासूच्या भूमिकेत पाहायला मिळाले होते. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत त्यांच्या मुलीने देखील काही वर्षांपूर्वी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले आणि आज या क्षेत्रात त्यांनी त्यांचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. त्यांच्या मुलीने काही महिन्यांपूर्वी छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध मालिकेत काम केले होते. ही मालिका आणि या मालिकेतील त्यांच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते.
ये रिश्ता क्या कहलाता है ही मालिका काही वर्षांपूर्वी चांगलीच गाजली होती. या मालिकेतील प्रत्येक भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. या मालिकेत आपल्याला कावेरी सिंघानिया म्हणेजच भाभी माँ ही भूमिका पाहायला मिळाली होती. ही भूमिका अभिनेत्री मेधा जंबोटकर यांनी साकारली होती. या मेधा याच मनोरमा यांच्या कन्या असून त्यांच्या या मालिकेतील भूमिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळाली होती.
मनोरमा वागळे यांच्या लग्नाआधीचे नाव सुमती तेलंग होते. त्यांनी बालपणापासूनच नाट्य संगीताचे धडे गिरवले होते. गोवा हिंदू असोसिएशनद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्याचदरम्यान त्यांचे लग्न नाट्य समीक्षक मनोहर वागळे यांच्यासोबत झाले. लग्नानंतर त्या अधिक नावारूपाला आल्यामुळे त्यांना प्रेक्षक मनोरमा वागळे याच नावाने ओळखू लागल्या. त्यांनी अनेक चित्रपटात खाष्ट, कजाग सासूची भूमिका साकारली होती. दिनूच्या सासूबाई राधाबाई या मधील त्यांनी साकारलेली सासूबाई प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.