कास्टिंग काउचच्या घटना आपल्याला बऱ्याचदा ऐकायला मिळतात. फक्त बॉलिवूडच नाही तर मराठी सिनेइंडस्ट्रीतही अशा घटना घडत असतात. दरम्यान आता मराठी चित्रपटसृष्टीतील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं कास्टिंग काउचबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. ही अभिनेत्री म्हणजे अर्चना नेवरेकर. अर्चना नेवरेकर ही मराठी चित्रपट, नाट्य तसेच मालिका अभिनेत्री आहे. नुकतेच अर्चना यांनी हिंदी सिनेसृष्टीत तिला आलेल्या वाईट अनुभवाचा खुलासा केला आहे.
फार कमी लोकांना माहित आहे की, सुप्रिया पाठारे यांची धाकटी बहीण अर्चना आहेत. त्यांनी चित्रपट मालिकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. पदरी चार मुली असल्यामुळे अर्चनाचे वडील मानसिकदृष्ट्या त्रस्त झाले होते. अशातच त्यांचे निधन झाले. त्यावेळी अर्चना अवघ्या पाच ते सहा वर्षांची होती. शाळेत शिकत असताना निलकांती पाटेकर आणि सुलभा देशपांडे यांनी अर्चना यांना बालकलाकार म्हणून नाटकातून अभिनयाची संधी मिळवून दिली होती. त्यावेळी नाटकातून मिळणारी रक्कम तिच्या कुटुंबासाठी मोठा आधार बनून गेली. आपण कमावलं तरच आपल्याला खायला मिळणार याची जाणीव तिला बालवयातच झाली. अर्चना यांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या जोरावर मराठीसृष्टीत स्वतःची ओळख बनवली. वासूची सासू हे अर्चना यांनी साकारलेलं पहिलं व्यावसायिक नाटक. ती फुलराणी, जन्मदाता , स्वप्न सौभाग्याचे, सुना येती घरा, वहिनीची माया अशा नाटकांमधून चित्रपटातून अर्चना यांना खूप प्रसिद्धी मिळत गेली.
मराठी सिनेइंडस्ट्रीत चांगलं नाव झाल्यानंतर अशातच अर्चना यांना हिंदी चित्रपटात झळकण्याची संधी मिळाली. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्चना यांनी स्वतः या गोष्टीचा खुलासा केला आहे. सुलेखा तळवळकर या आपल्या युट्युब चॅनेलवरून सेलिब्रिटींच्या मुलाखती घेत असतात. काहीच दिवसांपूर्वी त्यांनी अर्चना यांना या मुलाखतीत आमंत्रित केलं होतं. त्यावेळी अर्चनाने आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिलेला पाहायला मिळाला. यातच त्यांनी एक धक्कादायक खुलासा केला. अर्चना नेवरेकर यांनी सांगितले की, मी मराठी सिनेइंडस्ट्रीत चांगली स्थिरस्थावर झाले होते सगळी चांगली माणसं मला भेटत गेली. त्यामुळे चांगली कामे मला मिळाली आणि माझा चेहरा ओळखला जाऊ लागला. मी कोणी मोठी सुपरस्टार वगैरे असे काही नव्हते. मला त्या संधी आल्या पण होत्या. एका हिंदी चित्रपटासाठी माझं सिलेक्शन झालं होतं. मी नावं नाही घेत पण खूप मोठा चित्रपट होता. मी नाव नाही घेणार कारण पुढे खूप कॉम्प्लिकेशन्स येतील त्यांच्यामध्ये दोन मुलींचे सिलेक्शन झाले त्यात मी तो सिनेमा करणार होते. पण तो सिनेमा करण्यासाठी त्यांची अट हीच होती की, तुमचं सगळं ओके आहे आम्ही तुमचं सीरिअल्स मधलं काम पण बघितलं आहे. तुमचे फोटो पण चांगले आहेत. तुम्ही हा सिनेमा करताय पण या सिनेमात काम करायचं असेल तर तुला चार दिवस या चार लोकांसोबत राहावं लागेल.’
अर्चना पुढे म्हणाल्या की, त्यावेळी माझ्यासोबत जी दुसरी मुलगी सिलेक्ट झाली होती ती आजच्या घडीला टॉपला आहे. त्यावेळच्या आपल्याच बॅचची ती मुलगी आहे. मी शॉक झाले कारण निलकांती पाटेकर, सुलभा ताईंनी मला अभिनयाची संधी मिळवून दिली होती. पुढेही मला सहज चित्रपट मिळत गेले. दुसरी गोष्ट म्हणजे ही लोकं एक समज करू घेत असतात की या बॅकग्राउंडमधून आलेल्या स्ट्रगल केलेल्या मुली आपल्यासाठी सहज अव्हेलेबल असतात. कोणी गरिबीतूनवर आलेली मुलगी लबाड आणि डॅम्बीसच असतात. या समस्येला मी आणि सुप्रिया सामोरे गेलो आहोत. मात्र याबाबतीत सुप्रिया कोणाच्या थोबाडीत द्यायला सुद्धा घाबरायची नाही.