एका सर्वसामान्य गृहिणीच्या स्वप्नांचा रंजक प्रवास सांगणारा चित्रपट गोष्ट एका पैठणीची (Goshta Eka Paithanichi) आज भेटीला आला आहे. या चित्रपटात सामान्य स्वप्नं बाळगणाऱ्या 'इंद्रायणीच्या आयुष्यात आलेली पैठणी तिला कसा तिला रंजक प्रवास घडवते, हे पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात सायली संजीव (Sayali Sanjeev) आणि सुव्रत जोशी (Suvrat Joshi) मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाबद्दल बोलताना सायलीने काही रंजक गोष्टींचा खुलासा केला आहे. यावेळी तिने या चित्रपटासाठी तिची निवड कशी झाली, याबद्दल सांगितले.
लोकमतच्या फिल्म पंचायतमध्ये सायली संजीव आणि सुव्रत जोशीने हजेरी लावली होती. यावेळी सायलीला विचारण्यात आलं की, चित्रपटाने तुला निवडलं की तू चित्रपटाला निवडलंस. त्यावर सायली म्हणाली की, चित्रपटाने. आतापर्यंत मी केलेल्या सगळ्या चित्रपटांनी मला निवडलं. खोटे वाटेल लोकांना, पण मी कधीच स्क्रीप्ट वाचून, गोष्ट ऐकून किंवा अभ्यास करून की आता ही स्क्रीप्ट वाचू आणि मग विचार करून होकार देऊ, असे काहीच केलेले नाही. त्यांनी मला निवडले असेल. मला असं वाटतं की दिग्दर्शकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे तर मी होकार देते. मी स्टोरी काय आहे हे वगैरे जाणून घेण्याच्या भानगडीत पडत नाही. फक्त आपण छान काम करत राहायचे.
शंतनू गणेश रोडे लिखित, दिग्दर्शित गोष्ट एका पैठणीचीची निर्मिती अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग, पियुष सिंग, सौरभ गुप्ता यांनी केली आहे. तर अश्विनी चौधरी, चिंतामणी दगडे, सौम्या मोहंती विळेकर, गायत्री दिलीप चित्रे हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. मंत्रा व्हिजन प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माता अक्षय विलास बर्दापूरकर, पियुष सिंग, गोल्डन रेशो फिल्म्स आणि प्लॅनेट मराठी, लेकसाइड प्रॉडक्शन आहेत. सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, सुहिता थत्ते, मिलिंद गुणाजी, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, अदिती द्रविड यांच्या प्रमुख असलेल्या 'गोष्ट एका पैठणीची' हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे.