हिंदी व मराठी कलाविश्वात आपल्या अभिनयानं वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या सुलोचना दीदी अर्थात सुलोचना लाटकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांच्या तब्येत बिघडली होती. त्यानंतर त्यांना दादरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुलोचना दीदींनी आपल्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले होते. रुपेरी पडद्यावर प्रेमळ आई म्हणून प्रचलित असलेल्या सुलोचना दीदी खऱ्या आयुष्यातही खूप प्रेमळ होत्या. त्यांच्याबाबतीतली एक गोष्ट तुम्हाला माहित नसेल की त्यांना एका भिकाऱ्याने दिलेली एक वस्तू त्यांनी आजपर्यंत जपून ठेवली होती. जाणून घेऊयात हा किस्सा...
सुलोचना दीदींनी एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील सगळ्यात मोठी दाद कोणती, याबद्दल सांगितले होते. त्यावेळी त्यांनी एका भिकाऱ्याने दिलेली वस्तू आजपर्यंत का सांभाळून ठेवली होती हे सांगितले होते. त्यांनी सांगितले की, 'सांगते ऐका' चित्रपटाचा रौप्य महोत्सव होता. त्यावेळी खूप मोठे मोठे कलाकार आले होते. पुण्यातील मराठी आर्टिस्ट सगळेच तिथे हजर होते.
एका माणसाने माडगुळकरांच्या हातात काहीतरी दिले...
सुलोचना लाटकर यांनी पुढे सांगितले होते की, ग. दि. माडगूळकर आले त्यावेळी एका माणसाने त्यांच्या हातात काहीतरी दिले. कार्यक्रम सुरू झाला. माडगूळकर सगळ्यांबद्दल सांगत होते. सगळ्यांची ओळख करून देत होते. त्यानंतर माडगुळकर म्हणाले माझ्या मुठीत काहीतरी आहे जे सुलोचना बाईंसाठी आहे. ती खूप मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि हे काहीतरी ११ - १२ आणे आहेत. ते मी सुलोचना बाईंना देतो. त्यांनी याची पूजा करत राहावी. मला वाटते की त्यांनी ते खर्च करू नयेत. कारण ते एका भिकारी माणसाने अण्णांकडे पैसे दिले होते आणि सांगितले होते की हे तुम्ही सुलोचना बाईंना द्या. त्यांना माझे काम आवडले होते. अभिनय आवडला होता म्हणून त्याने ते दिले होते.' सुलोचना दीदींनी माडगूळकराचे म्हणणे ऐकले आणि कायम त्या पैशांची पूजा केली.