Join us

झपाटलेलामधील बाबा चमत्कार आज राहातात वृद्धाश्रमात, अतिशय वाईट आहे त्यांची परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2019 6:56 PM

बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा राघवेंद्र कडकोळ यांनी साकारली होती. त्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट आहे.

ठळक मुद्देराघवेंद्र यांची आज आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांच्या मदतीला पालाश इल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर धावून आलं आहे. ते आणि त्यांच्या पत्नी गेल्या काही महिन्यांपासून येथे राहत आहेत.

झपाटलेला या चित्रपटाला आज अनेक वर्षं झाली असली तरी या चित्रपटाची लोकप्रियता थोडीदेखील कमी झालेली नाहीये. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट प्रचंड गाजला होता. मराठी चित्रपटसृष्टीतील सगळ्यात चांगल्या चित्रपटांमध्ये या चित्रपटाची गणना नक्कीच होते. या चित्रपटातील प्रत्येक व्यक्तिरेखा आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. या चित्रपटातील लक्ष्या, महेश, तात्या विंचू या पात्रांसोबतच बाबा चमत्कार हे पात्र देखील चांगलेच प्रसिद्ध झाले होते. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, निवेदिता सराफ यांसारख्या खूप चांगल्या कलाकारांनी भूमिका साकारल्या होत्या.

झपाटलेला या चित्रपटानंतर या चित्रपटाचा दुसरा भाग म्हणचेज झपाटलेला 2 प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. या चित्रपटात आदिनाथ कोठारे मुख्य भूमिकेत होता. महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला देखील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. या दोन्ही चित्रपटांमध्ये आपल्याला बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा पाहायला मिळाली होती. ही भूमिका राघवेंद्र कडकोळ यांनी साकारली होती. राघवेंद्र गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी अश्रूंची झाली फुले, रायगडाला जेव्हा जाग येते यांसारख्या अनेक नाटकांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. 

ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून राघवेंद्र कडकोळ यांनी कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी चित्रपटसृष्टीत येण्यामागे देखील एक कथा आहे. त्यांना नौदलात भरती व्हायचे होते. आणि त्यासाठी त्यांनी परीक्षा देखील दिली होती. परीक्षा पास झाल्यानंतर त्यांना जहाजावर पाठवण्यात आले. सगळे काही सुरळीत सुरू असताना त्यांची पुन्हा मेडिकल टेस्ट करण्यात आली आणि त्यात त्यांच्या कानात दोष असल्याचे कारण देत त्यांना पुन्हा घरी पाठवण्यात आले. त्यांच्यासाठी हा खूपच मोठा धक्का होता. पण खचून न जाता त्यांनी पुढचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय घेतला. त्याच दरम्यान त्यांनी नाटकात काम करायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला नाटकांमध्ये खूपच छोट्या भूमिका साकारल्या. करायला गेलो एक या नाटकाद्वारे त्यांनी त्यांच्या अभिनयकारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. ते नाटक सांभाळून नोकरी करत होते. पण नाटकांच्या दौऱ्यामुळे सतत सुट्ट्या घ्याव्या लागत असल्याने त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यांनी नाट्य आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली.

राघवेंद्र यांची आज आर्थिक परिस्थिती बिकट असून त्यांच्या मदतीला पालाश इल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर धावून आलं आहे. ते आणि त्यांच्या पत्नी गेल्या काही महिन्यांपासून पुणे, बावधन येथील पालाश इल्डरली केअर अँड रिकव्हरी सेंटर येथे राहत आहेत.

टॅग्स :महेश कोठारे