सध्या सगळीकडेच मराठी सिनेमांची चर्चा आहे. अनेक चित्रपट सुपरहिट ठरत आहेत. मराठी सिनेमांना अच्छे दिन आलेत असं म्हणायला हरकत नाही. एक गोष्ट यामध्ये लक्षात येण्यासारखी आहे ती म्हणजे या काही दिवसात आलेल्या अनेक सिनेमांचं शूटिंग हे लंडनमध्ये झालं आहे. मराठी इंडस्ट्रीत अचानक ही लंडनची हवा आली कुठून? असा प्रश्न पडला असेलच. भारतात सोडून लंडनमध्ये शूट करण्याचा नक्की काय फायदा आहे याचं उत्तर दिग्दर्शक हेमंत ढोमेने दिलं आहे.
हेमंत ढोमेचा (Hemant Dhome) 'झिम्मा 2' हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. झिम्मा १ आणि आता त्याचा सिक्वल दोन्हीचं शूट हे परदेशात झालं आहे. यामागचं नेमकं कारण हेमंत ढोमेने एका पॉडकास्टमध्ये सांगितलं आहे. तो म्हणाला, 'भारतात शूट करायचं म्हटलं तर आपली सिस्टीम खूपच वाईट असल्याचं दिसून येतं. इथे पोलिसांना पैसे द्यावेच लागतात. मुंबईत शूट करा किंवा साताऱ्यात जाऊन शूट करा, पैसे देणं आलंच. शिवाय ग्रामपंचायतीलाही पैसे द्यावे लागतात. हजारो लोकेशन्स असतात त्यात कोणी म्हणतं माझं घरच दिसतंय, माझं दुकानच दिसतंय मग त्याला पैसे द्या.'
तो पुढे म्हणाला,'लंडनमध्ये मात्र खूप सगळं खूप क्लिअर आहे. एकदा या जागेचं किंवा रस्त्याचं नाव लिहून दिलं की त्या जागेवर कुठेही शूट कर, काहीही कर कोणी काही म्हणणार नाही. परमिशन्स घेतानाच काय काय लागतं ते सगळं मेन्शन करायचं.कोणीही येऊन तुमच्या कामात व्यत्यय आणत नाही. नागरिक येऊन असंच प्रेमाने चौकशी करतात फिल्मचं नाव विचारतात आणि जातात. म्हणून मला आणि इतरही निर्मात्यांना तिकडे जाऊन शूट करणं सोप्पं वाटतं.'
काही दिवसांपूर्वीच रिलीज झालेला 'तीन अडकून सीताराम' असो किंवा 'डेटभेट','व्हिक्टोरिया','बापमाणूस' हे चित्रपटही लंडनमध्येच शूट झाले आहेत. स्टोरी चांगली असेल तर सिनेमा नक्कीच हिट होतोय. आताच रिलीज झालेल्या 'झिम्मा 2' बद्दलही सकारात्मक प्रतिक्रिया आल्या आहेत.