'घर बंदूक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. या निमित्ताने दिग्दर्शक अभिनेते नागराज मंजुळे (Nagraj Manjule), आकाश ठोसर (Akash Thosar), सयाजी शिंदे असे सगळेच चर्चेत आहेत. 'घर बंदूक बिरयानी' या सिनेमात हे तिघेही दमदार भूमिकेत दिसणार आहे. सध्या काय तर नागराज यांच्या एका विधानाची चर्चा आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील कंपूशाहीबद्दल त्यांनी भाष्य केलं आहे. अलीकडे अभिनेत्री तेजस्विनी पंडित हिने मराठी चित्रपटसृष्टीतील कंपूशाहीवर भाष्य केलं होतं. नागराज मंजुळे सुद्धा त्यांच्या प्रत्येक सिनेमात आकाश ठोसरला कास्ट करतातच ना, असं ती म्हणाली होती. याच पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत नागराज बोलले.
“मराठी मनोरंजन सृष्टीत कंपुशाही आहे का किंवा कम्फर्ट झोनसाठी ठराविक कलाकारांबरोबरच काम केलं जातं का?” असा प्रश्न नागराज यांना केला गेला. यावर ते म्हणाले, “तेजस्विनी जे काही बोलली, तिच्या मताशी मी सहमत आहे. कम्फर्ट झोन सगळीकडे असतो, असलाही पाहिजे. तेजस्विनी आणि संजय जाधव मुद्दाम एकत्र काम करतात असं नाही. त्यांनी काम करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली. माझ्या गावाकडचे माझे मित्र हे अजूनही माझे चांगले मित्र आहेत. मी अमेरिकेत गेलो अन् बळजबरीने एखाद्याशी मैत्री केली, असं शक्य नाही. पण असंही नाही की मैत्री आहे त्या लोकांशिवाय काही काम करायचंच नाही. त्यामुळे मराठी सिनेसृष्टीत कंपुशाही आहे असं मला वाटत नाही. माझी आणि सया दादा यांचीही ओळख नव्हती. पण आम्ही एकत्र काम केलंच की...”
आकाश ठोसर म्हणाला...हाच प्रश्न आकाश ठोसर याला विचारला असता तो देखील यावर बोलला. परशा आणि संभ्यासाठी मीच का, असा प्रश्न मी सुद्धा नागराज अण्णांना विचारला होता. कदाचित त्यांना माझ्यात काही वेगळं दिसलं असले. परश्याच्या भूमिकेसाठी त्यांनी अनेकांच्या ऑडिशन घेतल्या होत्या. पण त्यांना माझ्यात काही खास दिसलं असावं, म्हणून त्यांनी माझी निवड केली. झुंडसाठी त्यांनी मला निवडलं आणि आता घर बंदूक बिरयानीमध्येही मी आहे. कंपूशाही वगैरे मला काहीही माहित नाही. त्याबद्दल मला काहीही कळत नाही, असं तो म्हणाला.