मराठी चित्रपटसृष्टीला येत असलेले चांगले दिवस, चित्रपटाचे बजेट वाढवण्याची तयारी आणि रिस्क घेण्याची बदलत चाललेली मानसिकता या सर्वांमुळे मराठी चित्रपट केवळ पुणे, मुंबईखेरीज नागपूर, नाशिक, औरंगाबाद आदी शहरांपुरताच मर्यादित न राहता थेट युके, युरोप मधील विविध शहरांपर्यंत मजल मारली आहे. आता पेईंग घोस्टचेच पाहा ना... या चित्रपटाने चक्क सातासमुद्रापार प्रीमियर आयोजित करून केवळ तेथील मराठीवासीयांनाच नव्हे तर मराठी चित्रपटसृष्टीलाही धक्का दिला आहे. याचे भन्नाट अनुभव उमेश कामतने शेअर केले.मराठी चित्रपट आजपर्यंत केवळ महोत्सवांपर्यंतच मर्यादित होता. परंतु, युरोपीयन देशांमध्ये प्रिमीयर झाला आणि त्यालाही चाहत्यांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. मराठी चित्रपटांना या निमित्ताने झळाळी मिळाली आहे. इंग्लंडमधील लंडन, बर्मिंग हॅम, मँचेस्टर, स्लाव्ह युरोपमधील ज्युसलडॉक, स्वित्झर्लंड, नेदरलँड येथील शहरात मराठी चित्रपटाचा प्रिमियर हा झक्कास एक्सपिरियन्स होता. या ठिकाणच्या चाहत्यांची भेटण्याची धडपड आणि अपेक्षेपेक्षाही जास्त मिळालेल्या रिस्पॉन्सने खरोखरीच खूप भारावून गेलो. फेसबुक, व्टिटरच्या माध्यमातून मिळणा-या कॉमेंटपेक्षाही प्रत्यक्षात कलाकारांना भेटल्यावर चाहत्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद खूप समाधान देणारा होता. त्यांनी माझा प्रत्येक चित्रपट, मालिका इंटरनेटवरून पाहिली होती आणि सतत पाहत असतात असे जेव्हा ते सांगत होते तेव्हा खूपच ग्रेट फिलींग येत होत. खरे तर परदेशात फॅमिलीबरोबर एकत्र बसून मराठी चित्रपट पाहणे ही कल्पना तशी अशक्यच. यातच मराठी चित्रपट परदेशात प्रदर्शित करणे हे देखील न परवडणारे. त्यामुळे चित्रपट डाऊनलोड करण्यावरच अधिक भर देणे हीच तिथली काहीशी मराठी चित्रपट संस्कृती होती. परंतु, ‘पेर्इंग घोस्ट’ चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर मराठी चित्रपट पाहण्याची अनुभूती त्यांना मिळाली. आजवर केवळ बॉलीवूडच्याच विशेषत: शाहरूख सलमान, आमीर खानच्याच चित्रपटांवर चाहत्यांच्या उड्या पडायच्या. तिथेही त्यांचा एक वेगळा प्रेक्षक निर्मात्यांनी कॅच केला आहे. परदेशात मराठीला कितपत रिस्पॉन्स मिळेल याची निर्मात्यांना शाश्वती नसे. त्यामुळे परदेशात मराठी चित्रपटांचे स्क्रिनिंग करण्याची रिस्क घेतली जात नसे. पण आता मराठी चित्रपटही सातासमुद्रापार जात आहेत. याचा मराठी चित्रपटसृष्टीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच फायदा होईल.
मराठी चित्रपटांचीही प्रीमियर वारी
By admin | Published: July 10, 2015 10:20 PM