‘अशी ही बनवा बनवी’ हा खळखळून हसवणारा मराठी सिनेमा. या सिनेमाचं नाव आठवलं तरी हसू येतं, हेच या चित्रपटाचं यश आहे. 1988 साली आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आज या चित्रपटाच्या प्रदर्शनाला 34 वर्षे पूर्ण झालीत. तीन दशकांपेक्षा अधिकचा काळ लोटला, पण या सिनेमाची जादू आजही कायम आहे. अगदी मराठी प्रेक्षकांच्या काळजावर कोरलेलं नाव असंच या चित्रपटाचं वर्णन करावं लागेल.
अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ रे, अश्विनी भावे, प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ, सुधीर जोशी, विजू गोखले, जयराम कुलकर्णी, सुहास भालेकर, नयनतारा अशा एकापेक्षा एक दिग्गजांच्या अभिनयाने सजलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांना लोटपोट केलं. सर्वांनाच प्रेमात पाडणाऱ्या या सिनेमाचे संवादही तुफान गाजलेत. इतके की आजही या सिनेमाच्या डॉयलॉग्सवरून मीम्स बनवले जातात. ‘मराठीतील पहिला मीम कंटेंट देणारा चित्रपट’ असा या चित्रपटाचा सोशल मीडियावर उल्लेख होतो, तो याचमुळे.
‘अशी ही बनवा बनवी’वरचे भन्नाट मीम्स म्हणजे मनोरंजनाची आणखी एक संधी. आज ‘अशी ही बनवा बनवी’ला 34 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त या चित्रपटावरचे एक से एक मीम्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ते वाचून तुम्हालाही हसू आवरणार नाही. बघा तर...
‘अशी ही बनवा बनवी’मधील अनेक डायलॉग प्रेक्षकांच्या आजही तोंडपाठ आहे. धनंजय माने इथेच राहतात का?, नवऱ्याने टाकलंय तिला, ७० रुपये वारले, लिंबाचं मटण इ. हे आणि असे अनेक डायलॉग्स चाहत्यांना आजही चांगलेच आठवतात. अशोक सराफ यांच्या तोंडचा ‘हा माझा बायको पार्वती’ हा डायलॉगही गाजलेला. पण कदाचित तुम्हाला ठाऊक नसेल की, हा डायलॉग अशोक मामांनी चुकून म्हटला होता. पुढं तोच सुपरहिट ठरला. अशोक सराफ यांनी चुकून ‘हा माझा बायको पार्वती’ असा डायलॉग चुकून म्हटला. दिग्दर्शकांना तो जाम आवडला आणि त्यामुळे तो न बदलता चित्रपटात तसाच ठेवण्यात आला. हा संवाद पुढे तुफान गाजला.