Join us

रमेश भाटकरांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टी हळहळली, वैभव मांगलेने जिंदादिल व्यक्ती गमविल्याची व्यक्त केली खंत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 6:27 PM

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग व अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

नाटक, मालिका आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात विविध भूमिका सक्षमपणे साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचे आज मुंबईतील एलिझाबेथ रुग्णालयात निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. गेले वर्षभर रमेश भाटकर कर्करोगाशी झुंज देत होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली. मराठी चित्रपटसृष्टीतील डॅशिंग व अतिशय चांगले व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

 मराठी चित्रपटसृष्टीने अतिशय चांगला आणि बुद्धिमान व्यक्ती गमावला आहे. ते त्यांच्या आजारपणाशी लढत होते, संघर्ष करत होते. मात्र त्यांच्या गेल्याने खूपच वाईट झाले. त्यांच्या कुटुंबाला या दु:खातून सावरण्याचे बळ मिळावे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.-निशिगंधा वाड

ज्येष्ठ अभिनेते गेल्याने चित्रपटसृष्टीत मोठी खिंड पडली. त्यांच्या मालिकेतून त्यांची एक स्ट्राँग इमेज निर्माण झाली होती. त्यांचा आणि माझा एका मालिकेतून ओळख झाली होती. खरेच भेटून असे वाटले की, एक सच्चा आणि मोकळ्या मनाचा माणूस असावा तर असा. त्याच्या इमेजला ‘यारों के यार... ’ अशी उपमा दिली तरी काही हरकत नाही. त्यांनी त्यांच्या डॅशिंग भूमिकांद्वारे खूप वर्ष लोकांच्या मनावर राज्य केले. त्यांचे जाणे म्हणजे चटका लावणारे. खूपच धक्कादायक बाब आहे. -प्रतिक्षा लोणकर

एक चांगला जिंदादिल व्यक्ती गमविला आहे. मी त्यांच्यासोबत एक वर्ष काम केले आहे. ते नेहमी सेटवर आनंदी वातावरण ठेवत असत. ते सेटवर उत्कृष्ट गाणीदेखील म्हणत असत. कामाप्रती ते अतिशय पॅशनेट असत. नेहमी वेळेवर हजर राहत. असा उमदा व्यक्ती एवढ्या लवकर जायायला नको होता.-वैभव मांगले

माझा खूप जवळचा मित्र होता. उत्कृष्ट कलाकारही होता. त्याच्या आतापर्यंतच्या भूमिकाही खूपच गाजल्या. माझ्या ‘प्रेम करुया खुल्लम खुल्ला’ या चित्रपटात त्याने व्हिलनची भूमिका साकारली होती. शिवाय एका चित्रपटाच्या कास्टिंगदरम्यान तो आमचा फॅमिली मेंबरच बनला होता. त्याला जेवढेही पारितोषिक मिळाले, त्या कार्यक्रमात आम्ही उपस्थित राहायचो. त्याच्या गेल्याने खूपच वाईट वाटले. एक चांगला मित्र गमविल्याचे दु:ख नेहमी वाटेल.-किशोरी शहाणे

आमचा एक चांगला फॅमिली फ्रेंड होता. तो माझा हितचिंतक ही होता. त्याची सर्व फॅमिली आमच्या जवळची होती. विशेष म्हणजे माझ्या कामाचे तो तोंडभरुन कौतुक करायचा. ‘पैसा पैसा पैसा’ या चित्रपटात त्याने माझ्या वडिलांची भूमिका साकारली होती. यातील भूमिका त्याने अतिशय उत्कृष्टपणे साकारली होती. खूपच चांगले व्यक्तिमत्त्व गमविले. त्याच्या निधनाने मी एक चांगला मित्र गमविला. -वर्षा उसगावकर 

टॅग्स :रमेश भाटकर