मराठी चित्रपटांना जीएसटीतून सूट देणार, मुख्यमंत्री शिंदेंचे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 11:48 AM2022-09-21T11:48:13+5:302022-09-21T11:48:44+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे नाट्य, चित्रपट क्षेत्राला आश्वासन
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मराठी नाट्य, चित्रपट आणि कला क्षेत्राला गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्रीएकनाथ शिंदे यांनी नाट्य-चित्रपट कलावंतांना दिली. मराठी नाट्य, चित्रपट,मालिका क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. यावेळी मराठी नाट्य, चित्रपट आणि मालिका क्षेत्रातील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार उपस्थित होते.
गोरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीत चांगले रस्ते, पायाभूत सुविधा, सुरक्षा आणि स्वच्छतेची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने पावले उचलण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चित्रपटांना जीएसटीमधून सूट, ज्येष्ठ कलाकारांसाठी मानधन योजना, त्यांना विनामूल्य वैद्यकीय सुविधा, ज्येष्ठ कलाकार, वादक, तंत्रज्ञ आदींना विमा संरक्षण याबाबत मंत्रालयात बैठक आयोजित करून संबंधित विभागांच्या समन्वयाने चर्चेतून मार्ग काढला जाईल, असे आश्वासनही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.
नाट्यगृहांची परिस्थिती सुधारणे, एकपडदा चित्रपटगृहांच्या समस्या तसेच चित्रपटांसाठी कर सवलत तसेच अन्य मुद्द्यांवरही विचारविनिमय, चर्चेने उपाययोजना केल्या जातील, असेही मुख्यमंत्र्यांनी कलावंतांना सांगितले. यावेळी प्रशांत दामले, अशोक सराफ, सचिन पिळगांवकर, महेश कोठारे, वर्षा उसगावकर, निर्माता विद्याधर पाठारे, मंगेश कुलकर्णी, पुष्कर श्रोत्री, जितेंद्र जोशी, गायक अवधूत गुप्ते, विजय पाटकर, विजय केंकरे, प्रसाद ओक, चंद्रकांत कुलकर्णी यांनी प्रातिनिधिक स्वरूपात त्या-त्या क्षेत्रातील समस्या आणि मुद्द्यांची मांडणी केली.
मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत रंगकर्मींच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील, असे सांगितले. ओटीटीबाबतही चर्चा झाली. या भेटीत मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री लवकरच पुन्हा एकदा रंगकर्मींना भेटणार आहेत. मनोरंजन विश्वाला भेडसावणाऱ्या समस्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहेत.
- विजय पाटकर, अभिनेते-दिग्दर्शक