धूमधडाका, थरथराट, अशी ही बनवाबनवीसारख्या मराठी चित्रपटांतील नायिका साकारली असली, तरी तशी ती सोज्वळच असायची. अनेक हिंदी चित्रपटांत कॅरेक्टर आर्टिस्ट म्हणूनही त्यांनी काम केले. मात्र, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्याशी विवाहानंतर निवेदिता जोशी यांनी रुपेरी पडद्यावरून ब्रेक घेतला. आता त्यांनी ‘देऊळबंद’ या चित्रपटातून पुन्हा कमबॅक केले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने मराठीमध्ये आणखी एक सोज्वळ, पण ग्लॅमरस आई मिळाली आहे. ‘देऊळबंद’मध्ये त्यांनी नायक गश्मीर महाजनीच्या आईचे काम केले आहे. तब्बल १५ वर्षांनी त्या पडद्यावर येत आहेत. दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितले की, मी त्यांना पाहिले होते ते धूमधडाका चित्रपटात डान्स वगैरे करताना. त्यामुळे तीच छाप डोक्यात होती. ‘वाडा चिरेबंदी’ नाटक पाहायला गेलो होतो. यामध्ये निवेदिता जोशी यांचा अभिनय पाहिला. त्यांना विचारायला गेलो. पहिल्यांदा वाटले की नास्तिक असतील तर काय? म्हणून विचारलं. अक्कलकोटचे स्वामी आहेत ना...त्या म्हणाल्या स्वामी समर्थ ...स्वामी समर्थ. स्वामींची गोष्ट आहे पण वेगळ्या अंगाने जाणारी. त्या म्हणाल्या, गोष्टही सांगू नको. अशाच कथेतून मला कमबॅक करायला आवडेल.
मराठीमध्ये आता सोज्वळ, पण ग्लॅमरस आई
By admin | Published: July 24, 2015 2:44 AM