राज चिंचणकर । लोकमत न्यूज नेटवर्कसंतांची भूमी म्हणून पावन झालेल्या महाराष्ट्रात श्री साईबाबांचे असंख्य भक्तगण आहेत. या भक्तांची साईबाबांवर निस्सीम श्रद्धा आहे. हाच श्रद्धेचा मळा आता मराठी रंगभूमीवर फुलणार आहे. साईबाबांचा संपूर्ण जीवनपट आता रंगभूमीवर साकारला जात आहे. साईभक्तांना आणि नाट्यरसिकांना नाटकाच्या माध्यमातून समग्र साई दर्शन घडणार आहे.‘माउली’ या नाट्यसंस्थेद्वारे या ‘साई माउली’ नाटकाचे प्रयोग रंगभूमीवर होणार आहेत. या अनोख्या प्रयोगाची संकल्पना व दिग्दर्शन अनिल सुतार यांचे आहे. अशा नाटकाला सहज पाठबळ मिळत नसल्याने, अनिल सुतार यांनी ही संकल्पना चित्रपटनिर्माते दीपक कदम यांना ऐकवली आणि त्यांनी नाटक रंगभूमीवर आणण्याचे नक्की केले. साईबाबांच्या बालपणापासून ते वृद्धापकाळापर्यंतचा जीवनपट या नाटकात दृश्यमान करण्यात आला आहे. नाटकाचे नेपथ्य व प्रकाशयोजना सुनील देवळेकर यांची आहे. विशाल जाधव यांनी यात साईबाबांची प्रमुख भूमिका रंगवली असून, ४५ कलाकारांचा ताफा या नाटकात आहे.लोकवर्गणीतून सामाजिक कार्याकडे...या नाटकासाठी दीपक कदम यांनी त्यांचा मित्रपरिवार, तसेच हितचिंतकांकडून लोकवर्गणी जमा करत ही नाट्यनिर्मिती केली आहे. या प्रयोगांतून उपलब्ध होणारा निधीसुद्धा सामाजिक कार्यासाठी उपयोगात आणला जाणार आहे.
मराठी रंगभूमीवर समग्र साई चरित्र..!
By admin | Published: June 08, 2017 2:33 AM