Madhuri Pawar: माधुरी पवार (Madhuri Pawar) ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात अढळ स्थान निर्माण केलं आहे. 'देवमाणूस','रानबाजार' या कलाकृतींमुळे ती घराघरांत पोहोचली. याशिवाय माधुरी एक उत्तम नृत्यांगणा देखील आहे. सध्या अभिनेत्रीने स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत एन्ट्री घेतली आहे. या मालिकेत माधुरी निकी नावाच्या महत्वाच्या भूमिकेत पाहायला मिळते आहे. त्याचबरोबरच तिची व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अशातच नुकतीच तिने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट चर्चेचा विषय ठरली आहे.
नुकतीच माधुरीने चाहत्यांसोबत एक महत्वाची अपडेट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने आपण मुंबईत शिफ्ट झाल्याची माहिती दिली आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर अभिनेत्रीने पोस्ट लिहून त्यामध्ये म्हटलंय, "झाले बाबा एकदाच मुंबईत शिफ्ट. सातारा - मुंबई - सातारा करण्यापेक्षा 'जीवाची मुंबई' काय असतंय ते एकदा करूनच बघू म्हणलं..!!" माधुरी पवारची ही पोस्ट लक्षवेधी ठरत आहे. मुळची साताऱ्याची असणारी ही अभिनेत्री आता मायानगरी मुंबईत शिफ्ट झाली आहे. आपल्या कामाच्यानिमित्ताने तिने मुंबईमध्ये घर घेतलंय.
दरम्यान, माधुरी पवारची ही पोस्ट पाहून चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्स करत म्हटलंय, "फ्लाटच घेतला का मुंबईमध्ये...", याचबरोबर "तुझे स्वतः चे घर व्हावे मुंबईत ही सदिच्छा...", अशा असं म्हणत चाहत्यांनी अभिनेत्रीला तिच्या नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.