काही दिवसांपूर्वीच आनंद म्हसवेकर दिग्दर्शित ‘यू टर्न’ या नाटकाने सहाशे प्रयोग पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे, या नाटकात अभिनेता गिरीश ओक आणि इला भाटे दोनच कलाकार असले तरी या नाटकाने प्रचंड यश मिळविले आहे. या नाटकाच्या यशाविषयीच अभिनेता गिरीश ओक यांनी लोकमत सीएनएक्सशी साधलेला मनमोकळा संवाद - Benzeer Jamadarच्या नाटकाचे सहाशे प्रयोग पूर्ण झाले याविषयी काय सांगाल?- या नाटकाचे खरं तर हे यश पाहून खूपच आनंद झाला आहे. सुरुवातीला एक वेगळ्या प्रकारचे नाटक करण्याचा हा प्रयत्न आमचा खूप धाडसी होता. या नाटकातून गंभीर विषय आम्ही विनोदी शैलीतून मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, नाट्य परिषदेचे ज्या वेळी पहिले संमेलन झाले, त्या वेळी हे नाटक दाखविण्यात आले होते. या नाटकाला अगदी पहिल्यापासूनच खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या नाटकाच्या प्रयोगाने सहाशेचा आकडा पार करणे, ही गोष्ट आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. च्या नाटकाने आठ वर्षांत २७ पुरस्कार प्राप्त केले आहेत याविषयी काय वाटते?- आमच्या नाटकाला महाराष्ट्र शासनाचा पहिला पुरस्कार मिळाला. त्यामुळे ही गोष्ट आमच्यासाठी खूप मोठी आहे. तसेच, २००८चे सर्वच पुरस्कार आमच्याच नाटकाला मिळाले होते. हे नाटक रंगमंचावर आले आणि प्रेक्षकांनी या नाटकामुळे नाट्यगृहाकडे यू टर्न घेतला. तसेच, हे जे पुरस्कार मिळाले आहेत, ती आमच्या नाटकाच्या यशाची मोठी पावती आहे.च्महाराष्ट्रातील नाट्यगृहाच्या परिस्थितीविषयी काय सांगाल?- महाराष्ट्रातील नाट्यगृहे ही चांगली आहेत; मात्र ती मेटेंन होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील नाट्यगृहांची परिस्थिती खूपच वाईट आहे. या नाट्यगृहांच्या वाईट परिस्थितीविषयी कलाकारांनी सातत्याने आवाज उठवूनदेखील काहीच केले जात नसल्याचे दिसते. यातुलनेत गोव्यातील शहरांत खूपच चांगली नाट्यगृह आहेत. नाट्यगृहेज्या गोष्टींनी परिपूर्ण व्हायला पाहिजेत, त्या होतच नाहीत. तसेच कलाकार आणि प्रेक्षकांसाठी नाट्यगृहात सुविधा असाव्यात. नाट्यगृह जनतेच्या पैशांनी उभारले असतात. नाट्यगृहांनचा चांगले राखयचे असेल तर त्याचे निरीक्षण करणारा व्यक्ती रंगभूमीची जाण असणारा हवा. च्पूर्वीची आणि आताची चित्रपटसृष्टी यांत काय फरक तुम्हाला जाणवतो?- सध्या नाटकाचे दौरे खूपच कमी झाली आहे. तसेच, ज्यातुलनेत इतर गोष्टींच्या किमती वाढल्या आहेत त्यातुलनेत नाटकाच्या तिकिटाचे दर वाढले नाहीत. ही गोष्ट खूप त्रासदायक आहे. त्याचप्रमाणे नाट्यगृहात चांगल्या सोयीसुविधा दिल्या तरच प्रेक्षकदेखील जास्त दराचे तिकीट खरेदी करून नाटक पाहतील. निदान प्रेक्षकांच्या बेसिक गरजा तरी पूर्ण केल्या पाहिजेत, असे मला वाटते. मल्टिफ्लेक्स चांगले असतात म्हणून तर प्रेक्षक जास्त दराचे तिकीट खरेदी करून तेथे जातात. या नाट्यगृहाच्या सोयीसुविधेसाठी कोणाकडे दाद मागावी, काही कळत नाही.च्मराठी रंगभूमीविषयी काय सांगाल?- महाराष्ट्रात नाट्यगृहांची इतकी दुरवस्था असतानाही मराठी रंगभूमी ही जागतिक पातळीवर सर्वांत अग्रेसर आहे. कारण, या रंगभूमीवर वेगवेगळ्या नाटकांचे विषय, प्रकार पाहायला मिळतात. त्याचबरोबर आपल्याकडे दिवसाला नाटकाचे दोन किवा तीन शो होतात, इतर ठिकाणी रंगभूमी ही फक्त वीकेंड शोसारखीच असते.च्आजच्या तरुणाईला करिअर म्हणून या क्षेत्राविषयी काय सांगाल?- खरं सांगू का, या क्षेत्राला वाव खूप आहे. प्रसारमाध्यमांचा वापर वाढतो आहे. नाटक, मालिका आणि चित्रपट मोठ्या प्रमाणात येऊ लागले आहेत. दहावी आणि बारावीनंतर तरुणाईने योग्य विचार करून या क्षेत्रात पावले टाकावीत. कारण चंदेरी दुनिया म्हणून या क्षेत्राचा विचार करू नये. तसेच या क्षेत्राला शास्त्रशुद्ध आणि तंत्रशुद्ध शिक्षण घेतलेल्या लोकांची गरज आहे. कारण हुशार दिग्दर्शक, लेखक, नेपथ्यकार यामुळे सध्या प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटकांची सीमा रेषा पुसट होऊन एक स्थित्यंतर निर्माण झाले आहे.
मराठी रंगभूमी जागतिक पातळीवर अग्रेसर
By admin | Published: December 26, 2016 5:44 AM