Join us

प्रसिद्धीमध्ये मराठी चित्रपटाची होते पिछाडी

By admin | Published: September 02, 2016 3:30 AM

बॉलीवूड व मराठी चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री सिया पाटील ही ‘फक्त तुझ्याचसाठी’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. नेहमीच बोल्ड अंदाजात दिसणारी सिया

बॉलीवूड व मराठी चित्रपटांत झळकलेली अभिनेत्री सिया पाटील ही ‘फक्त तुझ्याचसाठी’ या आगामी चित्रपटात प्रेक्षकांना दिसणार आहे. नेहमीच बोल्ड अंदाजात दिसणारी सिया या चित्रपटात मात्र एकदम सोज्वळ भूमिकेत पाहायला मिळेल. ‘सीएनएक्स’ला दिलेल्या मुलाखतीत सियाने काही मराठी चित्रपट हे चांगले असले, तरी प्रमोशनअभावी प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशी खंत व्यक्त केली. ‘फक्त तुझ्याचसाठी’ चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?-‘फक्त तुझ्याचसाठी’ हा चित्रपट स्त्रीप्रधान आहे. त्यामुळे माझ्या भूमिकेला या चित्रपटात चांगलाच वाव आहे. याच कारणाने मी हा चित्रपट स्वीकारला. या चित्रपटात मी शीतल नावाच्या एका ग्रामीण भागातील मुलीची भूमिका साकारत आहे. शहरात राहणाऱ्या आदित्य ठाकूरसोबत तिचे लग्न होते; पण आदित्यचे लग्नाआधीच अफेअर असते. लग्नानंतरदेखील तो त्याचे अफेअर सुरूच ठेवतो. याचदरम्यान नवऱ्याच्या मित्राकडे मी आकर्षित होते आणि मग तो कशा प्रकारे या गोष्टीकडे पाहतो, हे या चित्रपटात मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समाजातील स्त्रियांच्या स्थानाविषयी काय वाटते?-आजही आपल्या समाजात स्त्रियांनी एखादी चूक केली, तर तिला माफ केले जात नाही. पुरुषांनी कितीही चुका केल्या तरी त्यांना लगेचच माफ केले जाते. या गोष्टी विशेषकरून नवरा-बायकोच्या नात्यामध्ये घडतात. आजकाल नात्यांमधील विश्वास हरवत चालला आहे, तसेच एकमेकांबद्दलचा आदरही कमी होत चालला आहे. या चित्रपटाची कथा मी ज्या वेळी सुरुवातीला वाचली, तेव्हा मला ती पटलीच नव्हती. त्यामुळे मी दिग्दर्शकांना काही बदल करण्यास सांगितले. आपला नवरा जर चुकीचा वागतोय, तर बायकोचापण पाय घसरलाच पाहिजे, हे मला पटत नव्हते. माझ्यावर जर अशी वेळ आली तर मी घटस्फोट घेईन; पण असे काही करणार नाही. त्यामुळे हा चित्रपट आपण अमेरिकेत नाही, तर महाराष्ट्रात दाखवणार आहोत, याचे भान ठेवून आम्ही कथेत योग्य ते बदल केले. नवीन कलाकारांसोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा होता ?-या चित्रपटाची सगळीच कास्ट नवीन आहे. कथा चांगली असल्याने मी हा चित्रपट स्वीकारला. चित्रपट स्वीकारल्यानंतर चित्रपटातील कलाकार हे नवे असले, तरी अभिनयाने तगडे असावेत, असे माझे म्हणणे होते. यश कपूरने तर अप्रतिम काम केले आहे. अनेकदा दृश्यांचे चित्रीकरण करताना मी दिग्दर्शकांना काही बदल सुचवायचे. एखादे दृश्य विशिष्ट पद्धतीने चित्रित केले जावे, असे मी त्यांना सांगायचे. त्यातील काही दृश्य पाहिल्यावर मी चांगले दिग्दर्शनपण करू शकेन, असा मला विश्वास वाटतो. तू बॉलीवूडमध्येही काम केले आहेस. तुला मराठी चित्रपटांमध्ये काम करताना काही फरक जाणवतो का?-बॉलीवूडमध्ये मी काम केल्याने तिथली शिस्त आणि काम करण्याची पद्धत मला चांगलीच माहीत आहे. कोणतीही गोष्ट करताना ते ती अगदी अभ्यासपूर्वक करतात. त्यांचे सगळे प्लॅनिंग ठरलेले असते. सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे बॉलीवूडमध्ये बजेटचा कधी प्रॉब्लेम नसतो. त्यामुळे ते प्रमोशन आणि मार्केटिंगवर खूप सारा पैसा खर्च करतात. म्हणूनच त्यांचे चित्रपट चांगल्या रीतीने प्रेक्षकांपर्यंत पोहोचतात. नवीन येणाऱ्या निर्मात्यांबद्दल तू काय सांगशील?-आपल्याकडे चित्रपटनिर्मितीसाठी खरंतर सुशिक्षित लोकांची गरज आहे. कारण, आज कोणीही उठतो आणि चित्रपट करतो. या गोष्टी थांबायला पाहिजेत. कमी चित्रपट करा; पण दर्जेदार करा, असे मला वाटते. काही वेळा अशा निर्मात्यांमुळे नवीन येणाऱ्या मुलींची फसवणूकदेखील होते. त्यांची दिशाभूलही केली जाते. मलादेखील अनेक वेळा नको त्या निर्मात्यांना सामोरे जावे लागले आहे. मराठी चित्रपटांचे प्रमोशन कमी पडते, असे तुला वाटते का?- मराठी चित्रपटाचा आशय चांगला असला, तरी काही चित्रपटांचे योग्य प्रमोशन न झाल्याने ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. या गोष्टीचे एक कलाकार म्हणून मला खूप वाईट वाटते. कारण, आपण अपार मेहनत घेऊन काम करायचे आणि जर ते काम प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेच नाही, तर दु:ख हे आपल्यालाच होते.

- priyanka.londhe@lokmat.com