छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'रंग माझा वेगळा' (rang maza wegla). ही मालिका सुरु होताच अल्पावधीत लोकप्रिय झाली. त्यातूनही मालिकेतील दिपावर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. इतकंच नाही तर तिच्या आयुष्यात येत असलेल्या चढउतारांमुळे प्रेक्षकही हवालदिल होत असतात. यामध्येच आता दिपाच्या जीवाला धोका असल्याचं दिसून येत आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये दिपाच्या जीवाला धोका असून तिचा बॉम्बस्फोटात मृत्यू होणार असल्याचं दिसून येत आहे.
व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये एका हॉस्पिटलमध्ये बॉम्ब ठेवण्यात आला असून पोलीस आणि बॉम्ब नियंत्रण पथक या बॉम्बचा शोध घेत आहेत. यासाठी हॉस्पिटलमधील सगळ्या लोकांना बाहेर काढण्यात येतं. मात्र, एक लहान मुलगा हॉस्पिटमध्येच अडकल्यामुळे दिपा त्याला वाचवण्यासाठी आत जाते. त्याच वेळी तिला एक फोन येतो आणि तिला वजन काट्यामध्ये बॉम्ब असल्याची माहिती देतो. त्यामुळे इतरांचे प्राण वाचवण्यासाठी दिपा त्या वजन काट्यावर जाऊन उभी राहते.
दरम्यान, या प्रोमोवरुन मालिकेला नवीन वळण मिळणार असल्याचं दिसून येत आहे. परंतु, दिपाचे प्राण वाचतील का? दिपाला त्रास देण्यासाठी कार्तिकची ही नवी खेळी तर नाही ना? असे अनेक प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत. मात्र, या सगळ्यांची उत्तरं मालिका पाहिल्यावरच प्रेक्षकांना मिळणार आहेत.