मालवणमधील राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा सोमवारी दुपारी मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोसळला. आठ महिन्यांपूर्वी नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराजांच्या या पुतळ्यांचं अनावरण झालं होतं. अवघ्या काही महिन्यांतच पुतळा कोसळल्याने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला आहे. या घटनेनंतर सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. मराठी लेखक अरविंद जगताप यांनी या घटनेनंतर संतप्त पोस्ट शेअर केली आहे.
अरविंद जगताप यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन मोजक्या शब्दांत याबाबत संताप व्यक्त केला आहे. "कंत्राटदारांच्या जीवावर सरकार बनत असेल. महाराजांचा पुतळा नाही. प्रायश्चित वगैरे काही मानत असाल तर जगातलं सगळ्यात मोठं स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांचं व्हावं आणि तिथे पन्नास किलोमीटरपर्यंत कुठल्याही पक्षाच्या राजकारण्याचं चुकूनही नाव नसावं", असं त्यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्यांच्या या पोस्टवर कमेंट करत चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नौदल दिनानिमित्त दि. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल विभागाने राजकोट परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारला होता. हा पुतळा शिवप्रेमींसाठी आकर्षण ठरला होता. गेले दोन, तीन दिवस किनारपट्टीवर वादळी वारे आणि मुसळधार पाऊस सुरू आहे. यातच दुपारी वादळीवाऱ्यामुळे पुतळा कोसळला. हा प्रकार स्थानिकांच्या लक्षात येताच त्यांनी याची माहिती प्रशासनास दिली. त्यानंतर स्थानिक महसूल तसचे पोलिस अधिकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. २८ फूट उंच पुतळा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पूर्णाकृती पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनीपासून चबुतरा बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच पुतळा उभारण्यात आला होता. सुशोभीकरण आणि इतर व्यवस्थेसाठी सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली कार्यालयाने सुमारे पाच कोटी रुपये खर्च केले होते.
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट (अवयव) जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे. मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते. पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी नट-बोल्टचा वापर केला होता. पण आता पाऊस आणि खारे वारे यामुळे त्या नट- बोल्टना गंज पकडला असून त्यामुळे पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्रात म्हटले होते.