‘तू अशी जवळी राहा’ मालिकेद्वारे कन्यादानाविषयी मांडला जाणार वेगळा विचार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 08:00 AM2018-12-07T08:00:00+5:302018-12-07T08:00:02+5:30
‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत राजवीर आणि मनवा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. रविवारी ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा भाग पाहाता येणार आहे.
झी युवा वाहिनीने 'तू अशी जवळी राहा' ही एक वेगळ्या धाटणीची मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आणली आहे. ही मालिका एक परिकथेतील प्रेमकथा नसून ही कथा आहे वेड्या प्रेमाची आणि म्हणूनच या मालिकेचं कथानक प्रेक्षकांना भावत आहे. या मालिकेला आता चांगलीच कलाटणी मिळणार आहे.
‘तू अशी जवळी राहा’ या मालिकेत राजवीर आणि मनवा लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. रविवारी ९ डिसेंबर संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना हा भाग पाहाता येणार आहे. हा लग्न सोहळा अगदी दिमाखदार असणार आहे. दोन्ही परिवार एकत्र येऊन राजवीर आणि मनवा यांच्या आयुष्यातील हा महत्वाचादिवस खास बनवणार आहेत. लग्न सोहळा हा अगदी रीतसर असून हळद, मेहंदी, संगीत हे कार्यक्रम पार पडणार आहेत. मनवा तिच्या लग्नात मराठमोळ्या पेशवाई लुकमध्ये दिसणार आहे. नववारी साडी, नथ, पेशवाई दागिने आणि मुंडावळ्या यामध्ये मनवाचे सौंदर्य अगदी खुलून दिसणार आहे. ही मालिका सुरू होऊन काहीच दिवस झाले असले तरी या मालिकेतील कलाकारांचं बॉण्डिंग इतकं चांगलं आहे की, लग्न सोहळ्याचे चित्रीकरण सुरू असताना मनवाचे कुटुंबीय खरोखर भावुक झाले होते. तितिक्षाने याविषयी बिहाइंड द सिन गॉसिप सांगितले. ती सांगते, मालिकेतील कलाकारांचा एक व्हाट्सअॅप ग्रुप आहे आणि त्या ग्रुपवर नेहमी मनवाच्या घरच्या सेटवर आणि राजवीरच्या घरच्या सेवर चाललेल्या मजामस्तीच्या गप्पा रंगलेल्या असतात.
हा लग्न सोहळा फक्त एक समारंभ नसून त्यातून एक सुंदर विचार सगळ्यांसमोर मांडण्यात येणार आहे. त्याबद्दल बोलताना तितिक्षा सांगते, "या लग्नसोहळ्यातील एक गोष्ट माझ्या हृदयाला स्पर्श करून गेली ती म्हणजे 'कन्यादान' आणि या गोष्टी मागचा मनवाच्या वडिलांचा विचार. मनवाचे वडील मनवाचं कन्यादान करण्यासाठी नकार देतात कारण त्यांच्या मते मुलगी ही कुठली वस्तू नाही आहे जी कोणी दान करावी. जरी राजवीरशी मनवाचं लग्न झालं तरीही मनवा ही शेवटपर्यंत त्यांची मुलगीच राहणार आहे. हा विचार माझ्या मनाला खूप भिडला. कदाचित हा विचार प्रेक्षकांची विचारसरणी देखील बदलू शकेल."