Join us  

समशेरबाजीत गुंतलेला मसालापट!

By admin | Published: February 06, 2015 10:58 PM

एकदा का मसालापटाची मेजवानी द्यायची ठरवली, की त्यात तर्कांना स्थान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशावेळी ‘क’ च्या बाराखडीतले प्रश्न पडताच कामा नयेत,

एकदा का मसालापटाची मेजवानी द्यायची ठरवली, की त्यात तर्कांना स्थान देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशावेळी ‘क’ च्या बाराखडीतले प्रश्न पडताच कामा नयेत, अशी तजवीज चित्रपट मुळातच करून ठेवतो. त्यामुळे डोके बाजूला ठेवून चित्रपटाचा आस्वाद घेणे एवढेच हाती राहते. ‘बाजी’ चित्रपटही हाच कित्ता गिरवत आणि पूर्णत: व्यावसायिक हेतू बाळगत सुपर हीरोच्या माध्यमातून चकाचक सादरीकरण करतो. साहजिकच त्या अनुषंगाने हा चित्रपट तुफान धावला आहे; पण सतत काही ना काही मिळवण्याच्या शोधकार्यात आणि समशेरबाजीत गुंतलेला हा चित्रपट बऱ्यापैकी लांबलाही आहे. फक्त आणि फक्त मसालेदार रंग भरणे, एवढाच या चित्रपटाचा उद्देश असेल तर तो साध्य झाला आहे, असे म्हणावे लागेल. साहस आणि अद्भुत असे बरेच काही अचाट देऊ पाहणाऱ्या मसालेपटाचाच हा एक नमुना आहे. श्रीरंगपूरमध्ये किराणामालाचे दुकान चालवणारा चिद्विलास हा साधाभोळा तरुण आईसोबत राहतोय. गावातलीच मैत्रीण गौरीवर त्याचे प्रेम असते. गावात यांच्या जोडीला थंड डोक्याचा, पण डोक्यात कसले तरी वेड घेणारा मार्तंडही राहतोय. या गावात वर्षानुवर्षे एक दंतकथा सांगितली जाते़ ती म्हणजे जेव्हा जेव्हा गावावर संकट आले, त्या त्या वेळी गावकऱ्यांच्या मदतीला बाजी धावून आला आहे. ११व्या शतकातल्या या दंतकथेवर गावकऱ्यांचा विश्वासही असतो. लहानपणी एकदा जत्रेत गौरी जेव्हा उंच पाळण्यात अडकलेली असते, तेव्हा या बाजीनेच तिची सुटका केल्याची खात्री तिच्या मनात असते. हा बाजी तिच्या स्वप्नातला पुरु ष असतो. एकदा अचानक चिद्विलासला आपण बाजीचे वारस असल्याचा साक्षात्कार होतो आणि गावासाठी उपयोगी पडण्याची मनीषा त्याच्या मनात मूळ धरते. तर दुसरीकडे या गावातल्या जमिनीखाली प्रचंड खजिना दडलेला असल्याचे मार्तंडला समजते आणि हा खजिना मिळवण्याच्या हेतूने शोधकार्य करीत तो अख्खे गाव खणून काढण्याच्या कामाला लागतो. दरम्यान, चिद्विलास आणि मार्तंड आमनेसामने येतात. इथे ही गोष्ट वेगळेच वळण घेते आणि या गोष्टीत ‘बाजी’ची एन्ट्री होते. पुढे निर्माण होत गेलेली कोडी उलगडत ‘बाजी’ची घोडदौड सुरू राहते. चित्रपटासाठी केवळ मसालेपटाचा बाज पकडला की त्यात हाताशी असलेले सर्वकाही ओतण्याची हौस पुरेपूर भागवता येऊ शकते. साधेभोळेपण, प्रेमाची उत्कटता, सामान्यांचे घेतलेले कैवारीपण, कल्पनाविलास, दंतकथा, हीरोगिरी, मारझोड, गाणी, नाचकाम, अद्भुतता, साहस या आणि अशा सर्व वैशिष्ट्यांचा पूर या चित्रपटात आहे. साहजिकच डोक्याला कुठलेही प्रश्न पडू न देण्याची काळजी घेत बाजीला सामोरे गेल्यास तो नक्की रमवतो. मात्र हे सगळे दाखवताना ही ‘बाजी’ पावणेतीन तासांपर्यंत लांबत गेली असल्याने थकवाही देते. यात खजिना शोधण्यासाठी सतत केलेले खोदकाम अंमळ जास्त झाले आहे. यमक साधून जुळवलेली काही वाक्ये यातला हीरो मुळातच सुपर असल्याने खपून जातात. चित्रपटाचा पूर्वार्ध पात्रांची ओळख प्रस्थापित करण्यात बराच खर्ची पडला आहे; तर उत्तरार्धात गोष्ट गतीने सादर होते. दिग्दर्शक निखिल महाजन याने पूर्णपणे व्यावसायिक चित्रपट करताना मराठीत सुपरहीरो देण्याचा प्रयत्न केला आहे; मात्र हे करताना या चित्रपटावर हिंदी सिनेमाची दाट छाया पडलेली दिसते. फक्त मनोरंजन हा या चित्रपटामागचा हेतू मात्र साध्य झाला आहे. चित्रपटातले मारझोडीचे स्टंट अंगावर येतात, तर चित्रीकरण नजर खिळवून ठेवते. बाजीच्या भूमिकेत श्रेयस तळपदेने समशेरबाजी करीत चांगली कामगिरी केली आहे. भोळेपणापासून हीरोगिरीपर्यंतचा त्याने रेखाटलेला प्रवास मस्त आहे. जितेंद्र जोशीने रंगवलेला मार्तंड थंड, पण पाताळयंत्री असा भन्नाट खलनायक आहे. त्याची ही भूमिका त्याचे विविध पैलू समोर ठेवते. अमृता खानविलकरने गौरीच्या भूमिकेत गोडव्यासह चांगले रंग भरले आहेत. इतर भूमिकांमध्ये इला भाटे, संदेश कुलकर्णी यांच्यासह नागराज मंजुळे आणि रवि जाधव यांचेही दर्शन होते. एकंदरीत, हिंदी चित्रपटाच्या धाटणीचा मराठीतला सुपरहीरो देणारा ‘बाजी’ निव्वळ करमणूकप्रधान चित्रपटांच्या चौकटीत फिट्ट बसणारा आहे. मराठी चित्रपटराज चिंचणकर