चित्रपट परीक्षण - रेटिंग-१ स्टार, - अनुज अलंकार
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - कणकेमध्ये मीठ घातले तर पोळीची लज्जत वाढते परंतु मिठामध्ये कणिक घातली तर ते विष बनते अशी जुनी म्हण आहे. ही म्हण मिलाप जव्हेरीला समजली असती तर मनोरंजनाच्या नावाखाली त्याने ‘मस्तीजादे’ सारखा वाह्यात चित्रपट बनवला नसता. प्रौढांचे (अॅडल्ट) मनोरंजन करण्याच्या नावाखाली त्याने अतिशय दुय्यम दर्जाचा चित्रपट केला असून त्यात सेक्स आणि सेक्स याशिवाय काहीही नाही. यात कथा नाही आणि तिच्यासाठी काही प्रयत्नही केल्याचे दिसत नाही. कथेच्या नावावर केवळ पात्रं दिसतात. ब्रेक नसलेले वाहन जसे धावेल तशी त्यांची अवस्था झाली आहे. या चित्रपटाचे दोन मुख्य कलावंत आदित्य (वीरदास) आणि सनी (तुषार कपूर) हे मौजमस्ती करणारे व मुलींसोबत रंगेल आयुष्य घालविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. हे दोघांचा संबंध लैला आणि लिली (दोन्ही भूमिकांत सनी लिओनी) या जुळ््या बहिणीशी येतो. चित्रपटाचा पुढचा प्रवास होतो तो या संबंधांवरच. चित्रपटाचे दोष : अॅडल्ट कॉमेडीमध्ये मनोरंजनासाठी सेक्सी दृश्ये आणि दुहेरी अर्थ निघतील असे संवाद असणे आवश्यक आहे, असा समज स्वत: लेखक असलेल्या मिलाप जव्हेरींनी करून घेतलेला दिसतो. अशा प्रकारच्या चित्रपटांसाठी फार मोठ्या कथेची अपेक्षाही करता येत नाही परंतु लेखक आणि दिग्दर्शक असलेल्या जव्हेरींकडून या दोन्ही गोष्टींकडे सपशेल दुर्लक्ष व्हावे हेही अपेक्षित नाही. चित्रपटाला कथा नसल्यामुळे पात्रं भटकताना दिसतात व रासलीलेशिवाय ते दुसरे काहीही करताना दिसत नाहीत. मस्तीजादे आणखी वाईट व्हावा यासाठी त्यात गाणीही घालण्यात आली आहेत. बघायला आणि ऐकायला अतिशय टाकावू वाटतील अशा गाण्यांचा त्यात भडिमार आहे. कलाकारांबद्दल बोलायचे तर तुषार कपूरला पडद्यावर बघणे कसेतरीच वाटते. वीरदास चांगला कलाकार असला तरी या चित्रपटात तो फारच दुबळ््या भूमिकेत आहे. सह कलाकारांच्या भूमिकेत शाद रंधावा, असराणी, सुरेश मेनन हे देखील चित्रपटासारखेच दुबळे आहेत. पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत रितेश देशमुखला असल्या भूमिकांमध्ये बघणे अत्यंत वेदनादायी आहे. लेखक आणि दिग्दर्शक या नात्याने मिलाप जव्हेरीने बनविलेला हा चित्रपट दुय्यम प्रतीचा आहे. चित्रपटाची वैशिष्ट्ये : सनी लिओनीचे ‘दर्शन’ हे चित्रपटाचे वैशिष्ट्य आहे. सगळा चित्रपट तिच्या खांद्यावर असून दुहेरी भूमिकेत तिने आपली प्रतिमा आणि तिच्याकडून असलेल्या अपेक्षांनुसार शरीर दर्शन घडविले आहे. मसाला मनोरंजनाचे चाहते सनी लिओनीच्या दर्शनामुळे सुखावून जातील. चित्रपट का बघावा : सनी लिओनीच्या दर्शनासाठी चित्रपट का बघू नये : मनोरंजनाच्या नावावर हा अत्यंत वाह्यात चित्रपट आहे एकूण काय तर मनोरंजनाच्या नावाखाली ना शेंडा ना बुड असलेले चित्रपट बघणाऱ्यांसाठी मस्तीजादे ही भेट आहे. सर्वसामान्य प्रेक्षक अशा चित्रपटांपासून दूरच राहील. --------- -