मुंबई : काही वेळा मोठे किंवा फारसे न ऐकलेले शब्द वापरण्यात काही लेखक धन्यता मानतात. या साऱ्यामागे मी किती मोठा आहे, मला किती अगाध ज्ञान आहे, हे त्या लेखकाचा सांगण्याचा प्रयत्न असतो. पण काही लेखक फार सोपी, सहज वाटणारी भाषा वापरून कथा गुंफतात आणि बऱ्याच जणांच्या पसंतीस उतरतात. हीच गोष्ट सवाई एकांकिका स्पर्धेमध्ये विजेत्या ठरलेल्या औरंगाबादमधील नाट्यवाडा संस्थेच्या 'मॅट्रिक'ने दाखवून दिली.
'मॅट्रिक'मध्ये एका शेतकऱ्याच्या घरातील गोष्ट दाखवली होती. शेतकऱ्याची सध्याची अवस्था साऱ्यांनाच परिचित. पण आपल्या एकुलत्या एक मुलीच्या शिक्षणासाठी हे शेतकरी दांम्पत्य सारं काही विसरून झटत. आपण अशिक्षित असलो तरी मुलीला 'मॅट्रिक' पास करण्याचे त्यांचे जीवापाड प्रयत्न या एकांकिकेमध्ये दाखवले गेले. कुटुंबातील प्रत्येच व्यक्तीचं वागणं, त्याचं नातं लेखकाने निखालसपणे मांडलं होतं. त्यामुळे या एकांकिकेच्या प्रत्येक ब्लॅकआऊटला टाळ्या मिळत होत्या. प्रत्येक कलाकाराने ही एकांकिका किती घोटवून घेतली होती, हे त्यांच्या अभिनयातून दिसत होतं. या एकांकिकेतील बाबा ही भूमिका साकारणारा संतोष पैठणे हा सर्वोत्तम अभिनेता ठरला. यावेळी त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेली साथही मोलाची होती.
या एकांकिकेमध्ये झगमगाट नव्हता. अनाकलनीय गोष्टी नव्हत्या. त्यामुळेच ही एकांकिका साऱ्यांच्या मनात घर करून गेली. या एकांकिकेची भाषा सोपी असली तरी लेखकाने त्यामागून बरेच विषय दाखवले होते. सध्याची शेतकऱ्याची अवस्था, समाजाची मानसीकता, शिकण्याची आणि शिकवण्याची धडपड, बदल घडवण्याची आशा, वीजीगिषूवृत्ती या साऱ्या गोष्टी या एकांकिकेच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या. कोणत्याही गोष्टीमध्ये लेखक अडकताना दिसला नाही किंवा कोणतीही गोष्ट त्याने अर्धवट ठेवली नाही. कोणत्याही गोष्टीचे अवडंबर या एकांकिमध्ये नव्हते. पण नेमकेपणा मात्र नक्कीच होता. प्रवीण पाटेकर या लेखकाने एकांकिकेचा क्राफ्ट सुरेखपद्धतीने मांडला होता. त्यामुळेच पाटेकर यांना सर्वोत्तम लेखकाचा पुरस्कारही मिळाला.
अवघड गाणं 50 टक्के गाण्यापेक्षा सोपं गाणं 100 टक्के गायचं आणि विजय मिळवायचा, हे या एकांकिमध्ये पाहायला मिळालं. एकांकिकेचं एक मीटर असतं. त्या मीटरचा विचारही या एकांकिकेमध्ये केलेला दिसला. त्यामुळेच या एकांकिकेमधला शेवटचा धक्का डोळे विस्फारणारा ठरला. एकांकिका हसत-खेळत ठेवायची आणि शेवटी धक्का द्यायचा, हे पुन्हा एकदा या एकांकिकेमधूनन पाहायला मिळाले. काहींना नवीन रॅपरमधील जुनेच चॉकलेट अशी ही एकांकिका वाटूही शकेल, पण दुसरीकडे हाच फॉर्म्युला अजूनही यशस्वी ठरतानाचे दिसत आहे. स्पर्धा, स्पर्धेचे नियम, निकष, मीटर या सर्वांमध्ये 'मॅट्रिक' ही एकांकिका सरस ठरली आणि त्यामुळेच ती 'सवाई' होऊ शकली.