काल रविवारी बिग बॉस १६ चा ग्रॅण्ड फिनाले पार पडला. पुण्याचा एमसी स्टॅन हा यंदाच्या पर्वाचा विजेता झाला. सध्या एमसी स्टॅनवर कौतुकाचा वर्षाव होतोय. बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर स्टॅनने केलेली पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय.
एमसी म्हणतो...“आम्ही इतिहास रचला, नेहमीच खरं वागलो, नॅशनल टीव्हीवर रॅप हिपहॉप केलं. आईचं स्वप्न पूर्ण झालं आणि ट्रॉफी पी-टाऊनमध्ये आली. ज्याने ज्याने प्रेम दिलं त्या प्रत्येकाचा या ट्रॉफीवर हक्क आहे. शेवटपर्यंत एमसी स्टॅन...” असं त्याने पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टनंतर चाहत्यांनी त्याचं कौतुक करत, त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
इंडिया टुडेशी बोलताना स्टॅन म्हणाला, “मी बिग बॉस जिंकेल, अशी अपेक्षा मला नव्हती. शेवटच्या क्षणापर्यंत माझा भाऊ (शिव) शो जिंकेल,असंच मला वाटलं होतं. एकतर तो जिंकेल किंवा मी जिंकेल, हा विश्वास मात्र होता. शेवटपर्यंत आम्ही तेच बोलत होतो.सलमान विजेत्याची घोषणा करणार, त्यावेळी हसावं की रडावं, अशी माझी स्थिती होती. सुरूवातीला मी शोमध्ये बराच शांत असायचो. त्यामुळे मला अनेकजण कमकुवत समजू लागले होते. मी माझ्या फॅमिलीला खूप मिस करायचो, पण ते कुणाला सांगायचो नाही,” असं एमसी स्टॅन म्हणाला.
ग्रॅण्ड फिनालेत प्रियंका चहर चौधरी, एमसी स्टॅन व शिव ठाकरे हे टॉप ३ मध्ये होते. अखेरच्या क्षणी प्रियंका शोमधून बाहेर झाली. यानंतर शिव व एमसी यांच्यात तगडा मुकाबला रंगला. दोघांपैकी विजेतेपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, ही उत्सुकता ताणली गेली असतानाच स्टॅनने बाजी मारली. बक्षिसापोटी एमसी स्टॅनला ३१ लाख ८० हजार राेख, बिग बॉस्ची ट्रॉफी व Hyundai Grand i10 Nios ही गाडी मिळाली.