‘मीटू’ची वावटळ शांत झाली, असे वाटत असतानाच अचानक दिग्दर्शक राजकुमार हिरानी या वावटळीत अडकले. हिरानी यांच्यासोबत सहदिग्दर्शिका म्हणून काम करणाºया एका महिलेने हिरानी यांच्यावर लैंगिक गैरवर्तनाचे आरोप केलेत. पीडित महिलेने हिरानींच्या अलीकडे प्रदर्शित झालेल्या ‘संजू’या चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. हिरानी यांनी गत ६ महिन्यात (मार्च ते सप्टेंबर २०१८) अनेकदा आपले लैंगिक शोषण केल्याची व्यथा पीडित महिलेने मांडली. ‘संजू’च्या निर्मितीनंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचे तिने सांगितले. या आरोपानंतर हिरानी यांनी एक स्टेटमेंट जारी करत, या आरोपांचा इन्कार केला आहे. हा सगळा माझी प्रतीमा मलीन करण्याचा प्रयत्न असल्याचे त्यांनी म्हटले आहे. दोन महिन्यांपूर्वी माझ्यावर असे आरोप झाल्याचे मला कळले आणि मला धक्का बसला. हे सगळे प्रकरण कुठल्या लीगल बॉडीकडे वा कमेटीकडे नेण्याचा विचार मी केला असतानाच याप्रकरणात मीडियाची मदत घेतली गेली. पण हे आरोप मला मान्य नाहीत. या आरोपांचे मी खंडन करतो. हे सगळे आरोप एका कटाचा भाग आहेत आणि माझी प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न आहेत, असे हिरानींनी म्हटले आहे.राजकुमार हिरानी यांनी केलेल्या कृत्याची माहिती पीडित महिलेने ‘संजू’चे सहनिर्माते विधू विनोद चोप्रा यांना मेलद्वारे दिली होती. याशिवाय विधू यांची पत्नी अनुपमा चोप्रा, कथा लेखक अभिजात जोशी, विधू यांची बहीण आणि संचालिका शेली चोप्रा यांनादेखील तिने मेल केला होता. काल याप्रकरणी राजकुमार हिरानींच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली होती. हिरानी यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे वकील आनंद देसाई यांनी म्हटले होते.
काय आहेत आरोप राजकुमार हिरानी यांनी ९ एप्रिल २०१८ ला अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जेव्हापर्यंत मी शांत राहू शकत होते, तोपर्यंत गप्प बसले. कारण त्यावेळी मला नोकरी टिकवायची होती. मी त्यावेळी काही बोलले असते, तर माझे काम वाईट आहे, असे हिरानी यांनी सर्वांना सांगितले असते. त्यामुळे माझे भविष्य उद्ध्वस्त झाले असते, अशी व्यथा पीडितेने मेलमधून मांडली आहे.