काही दिवसांपूर्वी सोशल मिडीयावरुन ‘मी तुझीच रे’ या नवीन मालिकेचा प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आला ज्यामध्ये प्रेक्षकांना त्यांचे दोन आवडते कलाकार पहिल्यांदा एकत्र दिसले मात्र एकमेकांच्या विरोधात... आणि प्रेक्षकांच्याही समोर उपस्थित राहिला एकच प्रश्न आणि तो म्हणजे यांचा ‘३६चा आकडा की जुळणार ३६ गुण’? या मालिकेच्या प्रोमोमुळे आणि विशेष करुन मालिकेच्या नावामुळे प्रेक्षकांमध्ये मालिकेप्रती उत्सुकता वाढली असणार. यामध्ये संग्राम ‘जयदत्त काळे’ची भूमिका साकारत आहे जो मेहनतीने उपजिल्हाधिकारी बनला आहे आणि अमृता ‘रिया वर्दे’ची भूमिका साकारतेय जी श्रीमंत कुटुंबातील बेफिकिर मुलगी आहे.
रियाचा उध्दट आणि बंडखोर स्वभाव आणि त्याचउलट जयदत्तचा फ्रेण्डली आणि माणुसकीची जाण असणारा स्वभाव याची झलक सर्वांनी पाहिलीच आहे. समोर आलेल्या कठीण परिस्थितीवर हसत-खेळत किंवा मजेशीर पध्दतीने पण तोडगा निघू शकतो हे जयदत्तने अगदी कूल स्टाईलने दाखवून दिले आहे. आणि या कारणामुळेच त्यांच्यामधील ‘तू-तू मैं-मैं’ केमिस्ट्री आणि त्यांच्यामध्ये उडणारे खटके पाहायला प्रेक्षक नक्कीच आतुर झाले असतील.
समाजात, स्वभावात अशा ब-याच चांगल्या-वाईट गोष्टी असतात ज्याचा परिणाम हा कोणत्या ना कोणत्या प्रकारे होतच असतो. अशाच प्रकारचे स्वभावाला घातक अशा गोष्टी म्हणजे पैसा, सत्ता, अधिकार आणि अप्रामाणिकपणा. या गोष्टींना आवर घातला गेला पाहिजे म्हणून याच्या विरोधात जाऊन परिस्थितीला योग्य पध्दतीने हाताळून जगण्यासाठी अनेक मार्ग निघू शकतात. प्रत्येकाला समजेल, पटेल, रुचेल अशी या मालिकेची कथा आहे.
सुरुवातीलाच प्रोमोमधून संग्राम आणि अमृतामधील नोक-झोक, त्यांच्या केमिस्ट्रीच्या अगदी विरुध्द असे मालिकेचे नाव यामुळे प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली असणार यात शंका नाही.