आपल्या उत्तम अभिनयामुळे संदीप पाठकची खास ओळख आहे. फ्लाइंग गॉड फिल्म्स, विश्वास मीडिया अॅण्ड एंटरटेनमेंट निर्मित आणि बिपिन शहा मोशन पिक्चर्स प्रस्तुत ‘रंगा पतंगा’ या चित्रपटात संदीपने पोपट ही धमाल व्यक्तिरेखा साकारली आहे. यानिमित्ताने संदीपशी केलेली बातचीत...मकरंद अनासपुरे यांच्यासारखा उत्तम अभिनेता समोर असताना ‘पोपट’ साकारणं आव्हान नाही वाटलं?लेखकानं कथा, पटकथेत जे पात्र लिहिलंय ते स्वत:चे शंभर टक्के देऊन साकारणं महत्त्वाचं वाटतं. लहानपणापासून मकरंद अनासपुरे यांना पाहत आलोय. उत्तम विनोद त्यांच्याकडूनच शिकलो. या चित्रपटातला विनोद ब्लॅक ह्युमर, उपरोध, विसंगती प्रकारातला आहे. हसता हसता विचार करायला लावणारा आहे. विनोद करणं हेच खूप गंभीर काम असतं. मकरंद अनासपुरे स्वत: खूप तयारी करून आले होते. त्यांनी मदत केली नसती, तर ही भूमिका चांगल्या रीतीनं उभी राहिली नसती. त्यांच्या शांत राहण्यानं पोपटची पोपटपंची अर्थपूर्ण झाली. ‘रंगा पतंगा’ चित्रपटाविषयी काय सांगशील?आतापर्यंत वैविध्यपूर्ण भूमिका माझ्या वाट्याला आल्या. त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. यातील पोपट ही व्यक्तिरेखा नक्कीच आव्हानात्मक होती. चित्रपटाचा विषय खूप गंभीर आहे. एका शेतकऱ्याचे बैल हरवले या एका ओळीच्या गोष्टीपलीकडे जाऊन ही कथा मांडली आहे. पोपट या भूमिकेविषयी काय वाटतं?ग्रामीण भागातल्या चतुर आणि उचापती माणसांचं प्रतिनिधित्व पोपट करतो. त्याची सामाजिक, राजकीय समज फार महत्त्वाची आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन तो मैत्रीचं नातं निभावतो. त्याच्या व्यक्तिमत्त्वातला प्रामाणिकपणा आजच्या समाजासाठी महत्त्वाचा आहे. हा प्रामाणिकपणा समजून घेऊनच ही व्यक्तिरेखा करणं महत्त्वाचं होतं. आतापर्यंतच्या माझ्या भूमिकांत पोपट नक्कीच वेगळा आहे. राज्यात दुष्काळी परिस्थिती असताना ‘रंगा पतंगा’ प्रदर्शित होत आहे. त्या दृष्टीनं हा चित्रपट कसा महत्त्वाचा वाटतो?रंगा पतंगा नक्कीच वेगळा चित्रपट आहे. त्यात दुष्काळ, शेतकरी, राजकारण, समाजकारण, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सगळ्या मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. मात्र, माणूस म्हणून विचार करताना हा चित्रपट ‘रिलेव्हंट’ राहू नये असं वाटतं. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या पाहिजेत, दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ नये, राजकीय अनास्थेवर बोलत राहण्यापेक्षा स्वत: बदल घडवण्यासाठी प्रयत्न करावेत. चित्रपटात वैदर्भीय बोलीचा वापर केला आहे. ही बोली अचूकपणे बोलण्यासाठी काही वेगळा प्रयत्न करावा लागला का ?वैदर्भीय बोलीचा लहेजा वेगळा आहे, बोलण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र, समस्या त्याच आहेत. आम्ही दोघंही ग्रामीण आणि दुष्काळग्रस्त भागातले असल्यानं या समस्यांची पूर्ण जाणीव होती. त्यामुळे या भूमिकांसाठी वेगळी तयारी करावी लागली नाही. त्याशिवाय लहेजा परिचयाचा होता. आमचे काही नातेवाईक विदर्भातले असल्यानं आणि आमचंही येणं-जाणं असल्यानं आम्हाला ती बोली माहीत होती. परिपूर्ण वैदर्भीय बोलण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे.रंगा पतंगा प्रेक्षकांनी का बघावा?सद्य:स्थितीवर प्रामाणिक भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. हसणं, रडणं, चुकचुकणं या सगळ्या भावना प्रेक्षकांना नक्की अनुभवायला मिळतील. चिमटे काढत, कोपरखळी मारत वस्तुस्थिती सांगितली आहे. वेगळ्या दृष्टिकोनातून परिपूर्ण मनोरंजन केलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी हा चित्रपट थिएटरमध्येच जाऊन पाहावा.
अर्थपूर्ण ‘पोपटपंची’
By admin | Published: April 01, 2016 2:28 AM