मराठमोळी अभिनेत्री मीरा जोशी नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत येत असते. कधी तिच्या डान्समुळे तर कधी ग्लॅमरस फोटोंमुळे ती चर्चेत येत असते. मात्र यावेळेला ती एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिने जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या तुंगानाथ शिवमंदिरात नृत्य आराधना करत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तुंगानाथ शिवमंदिरासमोर शिव वर्णम सादर करणारी मीरा जोशी ही पहिली अभिनेत्री ठरली आहे. तिच्या नृत्याविष्काराची नोंद 'हाय रेंज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' आणि 'इंडिया रेकॉर्ड'मध्ये झाली आहे.
उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये असलेले तुंगनाथ शिवमंदिर हे जगातील सर्वाधिक उंचीवर असलेले मंदिर आहे. तुंगनाथ पर्वतावर असलेले हे शिवमंदिर ११ हजार ३८५ फूट उंचीवर आहे. मीराला अभिनयाबरोबर ट्रेकिंगची आवड आहे.
१६ मार्च रोजी पहाटे ३ वाजता तिने चंद्रशीला शिखरावर ट्रेकिंगला सुरुवात केली. ती सूर्योदयाच्या वेळी शिखरावर पोहचली. त्याखालीच असलेल्या प्राचीन तुंगानाथ शिवमंदिरासमोर मीराने नृत्य सादर केले.
तिने सांगितले की, मी भगवान शंकराची भक्त असून तुंगानाथ मंदिराला भेट द्यावी हे माझे स्वप्न होते आणि ते आता साकार झाले आहे. १६ मार्च रोजी तुंगानाथ मंदिर परिसरात बर्फ नव्हता. त्या संधीचा फायदा घेत मी नृत्य केले. खरे तर तापमान ६ डिग्रीपर्यंत होते. तिथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. भगवान शिवशंकराच्या आशीर्वादाने माझे ध्येय पूर्ण झाले.
मीराच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर ती फक्त मराठी वाहिनीवरील स्पेशल पोलीस फोर्स नामक मालिकेत झळकली होती. यात तिने एका सहायक पोलीस अधिकारीची भूमिका साकारली होती. याशिवाय मीरा 'वृत्ती' नामक मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात ती अंजलीची भूमिका साकारताना दिसणार आहे.