टीटीएमएम (तुझं तू माझं मी) अशा आगळ्यावेगळ्या खुमासदार नावातूनच चित्रपटातील आशयाबद्दल प्रेक्षकांच्या मनात कुतूहल निर्माण झाले आहे. लोकमत आॅफिसला दिलेल्या भेटीदरम्यान कलाकार ललित प्रभाकर आणि नेहा महाजन यांनी या चित्रपटाच्या कथानकाविषयी खुलासा केला. नेहा चित्रपटाविषयी बोलताना सांगते, ‘हा चित्रपट म्हणजे नुसतीच लव्हस्टोरी किंवा आम्हा दोघांच्या प्रेमाची कथा नाही तर चित्रपटातील सर्व पात्रांच्या नात्यांचा, मैत्रीचा प्रवास आहे. परिस्थिती बदलताना पात्रांमध्ये होणारा भावनिक बदल यातून दाखवण्यात आला आहे.’ टीटीएमएम या चित्रपटातील गाण्यांचे चित्रीकरण खूपच वेगळ्या पद्धतीने करण्यात आले आहे. याविषयी माहिती देताना चित्रपटाचे दिग्दर्शक कुलदीप जाधव सांगतात,‘ गाणी हा चित्रपटाचाच एक भाग असतो. त्यातून कथानक पुढे सरकायला हवे अशा पद्धतीने या चित्रपटातील गाण्यांची मांडणी करण्यात आली आहे. या चित्रपटाद्वारे ललित आणि नेहा यांची जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सहकलाकारांच्या केमिस्ट्रीविषयी बोलताना ललित सांगतो, ‘एकमेकांविषयी फार काही माहीत नसले तरी सुद्धा पडद्यावर ते नाते सहजतेने साकारणे हेच उत्तम अभिनयाचे लक्षण आहे. त्यात खरी मजा आहे.’ या चित्रपटाचे निर्माते डॉ. संतोष सावंत लोकमतशी बोलताना सांगतात, ‘चित्रपटाचा आशय आणि मार्केटिंग या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वपूर्ण आहेत. नायक नायिकांबरोबर इतर पात्रांनीही चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने प्रेक्षकांना एक उत्तम अनुभव मिळणार आहे. काहीतरी वेगळे करण्याची ओढ असलेले, लग्नापासून दूर पळून आलेले नायक-नायिका या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. रोमान्स, ह्युमर, इमोशन्स या तिहेरी प्रवाहांचा मिलाफ म्हणजे टीटीएमएम हा चित्रपट आहे.’ हा एक फॅमिली ड्रामा असून इरॉस इंटरनॅशनल आणि वैशाली एंटरटेनमेंट प्रस्तुत टीटीएमएम येत्या १६ जूनला प्रदर्शित होणार आहे.
‘टीटीएमएम’च्या टीमची लोकमत आॅफिसला भेट
By admin | Published: June 07, 2017 2:44 AM