विनोदवीर, कॉमेडीचा बादशहा महमूद यांचा आज वाढदिवस. 29 सप्टेंबर 1932 रोजी जन्मलेले महमूद केवळ कॉमेडियन नव्हते तर दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेतेही होते. आपल्या चार दशकांच्या करिअरमध्ये महमूद यांनी सुमारे 300 चित्रपटांत काम केले. 23 जुलै 2004 ला बॉलिवूडच्या या प्रसिद्ध अॅक्टरने जगाचा निरोप घेतला. पण त्यांच्या अभिनयाचे लोक आजही वेडे आहेत.
अभिनेता बनण्याआधी महमूद यांनी टॅक्सी चालवली, चॉकलेट विकलीत. इतकेच नाही तर दिग्गज अभिनेत्री मीना कुमारी यांना टेनिस शिकवण्याचीही नोकरी केली.
मीना कुमारींना टेनिस शिकवता शिकवता महमूद मीना यांची लहान बहीण मधु हिच्या प्रेमात पडले. पुढे दोघांनी लग्न केले. ट्रेसी अलीसोबत त्यांनी दुसरे लग्न केले. यशाच्या शिखरावर असताना एका अभिनेत्रीसोबतही त्यांचे नाव जोडले गेले. ही अभिनेत्री कोण तर अरूणा इराणी. औलाद, हमजोली, नया जमाना, गरम मसाला, दो फूल अशा अनेक चित्रपटात महमूद व अरूणा इराणी यांनी एकत्र काम केले होते. याचकाळात अरूणा व महमूद यांच्या प्रेमाची चर्चा सुरु झाली होती. पुढे अनेक वर्षांनंतर खुद्द अरूणा इराणी यांनी महमूद यांच्यासोबतच्या नात्याचा खुलासा केला होता.
‘आम्ही खूप चांगले मित्र होतो. कदाचित मैत्रीपलीकडेही काही होतो. याला तुम्ही आकर्षण म्हणू शकता, मैत्री म्हणू शकता किंवा आणखी काही म्हणू शकता. पण आम्ही कधीच लग्न केले नाही. आम्ही प्रेमात नव्हतो. असतो तर कदाचित हे नाते आम्ही पुढे नेले असते. मी चित्रपट निवडताना महमूद यांचा सल्ला घ्यायची. पण एकवेळ अशी आली की, तीन वर्षे माझ्याकडे काम नव्हते. याचे कारणही महमूद होते. लोकांनी आमचे नाते चुकीच्या पद्धतीने घेतले. त्यामुळेच आमच्या लग्नाची अफवाही उडाली. पडद्यावर आमची केमिस्ट्री चांगली होती. मी त्या वयात होते, ज्या वयात आकर्षण असते. लोक आमच्याबद्दल बोलत होते. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करत होतो....,’ असे अरूणा इराणी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते.