Meri Husband Ki Biwi New Song: 'सिंघम अगेन' चित्रपटामधील आपल्या परफॉर्मन्सने अभिनेता अर्जुन कपूरने (Arjun Kapoor) प्रेक्षकांना थक्क केलं. या चित्रपटाच्या यशानंतर अभिनेता आता एका आगळ्या-वेगळ्या भूमिकेतू प्रेक्षकांच्या समोर येत आहे. पण, या सिनेमात तो खलनायक नाही तर दोन सुंदरींसोबत रोमान्स करताना दिसणार आहे. लवकरच त्याचा 'मेरे हसबंड की बिवी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अर्जुन कपूरसोबत या चित्रपटामध्ये रकुल प्रीत सिंग (Rakul Preet Singh)आणि भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) या नायिका पाहायला मिळणार आहेत. अलिकडेच 'मेरे हसबंड की बिवी' चा धमाकेदार ट्रेलर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर पाहिल्यामुळे प्रेक्षक चित्रपटाच्या प्रदर्शनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच नुकतंच सिनेमातील नवीन गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं अनेकांच्या पसंतीस उतरलं आहे.
नुकतंच 'मेरे हसबंड की बिवी' मधील गोरी है कलाइया हे नवंकोरं गाणं रिलीज करण्यात आलं आहे. हे गाणं अमिताभ बच्चन आणि जया प्रदा यांच्या 'आज का अर्जुन' सिनेमातील 'गोरी है कलाइया' गाण्याचं नवं व्हर्जन आहे. आता हे गाणे नव्या रूपात प्रेक्षकांना ऐकायला मिळणार आहे. रॅपर बादशहा, कनिका कपूर, शर्वी यादव आणि आयपी सिंग यांनी या गाणी आवाज दिला आहे. यामध्ये अर्जुन, भूमी आणि रकुल यांची केमिस्ट्री प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. अभिनेता अर्जुन कपूरनेही सोशल मीडियावर व्हिडीओच्या माध्यमातून गाण्याची झलक दाखवली आहे. विदेसी ना भाऐ, जब देसी सजे... असं कॅप्शन देत हे गाणं सोशल मीडियावर शेअर करण्यात आलंय.
'मेरी हसबंड की बिवी'मध्ये कॉमेडी आणि धमाल पाहायला मिळते आहे. त्याचबरोबर अनेक दिवसांनी अर्जुन कपूर प्रेक्षकांना रोमँटिक भूमिकेत दिसणार आहे. मुदस्सर अजीझ यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. 'मेरी हसबंड की बिवी' हा सिनेमा नवीन वर्षात फेब्रुवारी महिन्यात रिलीज होणार आहे. 'लव्ह ट्रँगल नही सर्कल है' अशी या सिनेमाची टॅगलाइन आहे. जॅकी भगनानी आणि वासू भगनानी यांच्या पूजा एंटरटेनमेंटने या सिनेमाची निर्मिती केलीय. २१ फेब्रुवारी २०२५ ला हा सिनेमा संपूर्ण भारतात रिलीज होणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने अर्जुन कपूर कशी कमाल करणार? सिनेमा सुपरहिट होणार का? याकडे सर्वांचं लक्ष आहे.