लैंगिक शोषण, गैरवर्तन, मानसिक छळ असे सगळे काही सहन करणाऱ्या पीडितांसाठी ‘मीटू’ मोहिम वरदान ठरू पाहत आहेत. अनेक वर्षे दबलेल्या प्रकरणांचा वाचा फुटल्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतील बरेच जण पीडितांच्या बाजूने उभे राहताना दिसत आहेत. अलीकडे अजय देवगण आणि तब्बूचा आगामी चित्रपट ‘दे दे प्यार दे’ची असिस्टंट डायरेक्टर तान्या पॉल सिंह हिने अजयचा मेकअप आर्टिस्ट हरिश वाधोने याच्यावर छेडछाडीचा आरोप केला होता. तान्याच्या या आरोपानंतर हरिशची हकालपट्टी करण्यात आली आहे.
तान्याने आपल्या सोशल अकाऊंटवर पोस्ट शेअर करत हरिशच्या गैरवर्तनाबद्दल सांगितले होते. कुठला तरी सीन बदलण्यावर चर्चा होत असताना कुणीतरी माझ्या पाठीला स्पर्श करत असल्याचे मला जाणवते. कुणीतरी सेटवरची एखादी महिला मसाज देतेय, असे मला वाटले. पण नंतर मी मागे वळून बघितले असता तो हरिश होता. हरिशला पाहून मी जाम संतापले आणि त्याला चांगलेच सुनावले,’असे तान्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते. तान्याने यानंतर चित्रपटाचे दिग्दर्शक लव रंजन यांच्याकडे याबाबत तक्रार केली होती. तिच्या तक्रारीनंतर लव रंजन यासंदर्भात अजय देवगणसोबत चर्चा केली आणि या चर्चेअंती हरिशला कामावरून काढण्यात आले.तान्याने या कारवाईबद्दल आनंद व्यक्त केला आहे. हरिश हा अजयचा जुना सहकारी होता. त्यामुळे ते त्याच्याविरूद्ध कारवाई करतील, असे मला वाटले नव्हते. पण अजयने कठोर निर्णय घेतला, याचे मला समाधान आहे, असे तान्याने म्हटले आहे.