दिग्दर्शक साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्राने केलेल्या लैंगिक गैरवर्तवणुकीच्या आरोपानंतर सुपरस्टार अक्षय कुमारने नाना पाटेकर व साजिद खान यांच्या या प्रकरणाची संपूर्ण चौकशी होईपर्यंत 'हाऊसफुल 4' सिनेमाचे चित्रीकरण थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. या चित्रपटातील इतर कलाकारांनीदेखील अक्षयसारखीच ठोस भूमिका घ्यावी असे आवाहन अक्षयची पत्नी अभिनेत्री ट्विंकल खन्नाने केले होते. या चित्रपटात अभिनेता रितेश देशमुखदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यानेदेखील याप्रकरणी आपले मत ट्विटरवर व्यक्त केले आहे.
रितेश देशमुखने ट्विटरवर लिहिले की, या सर्व महिलांच्या व्यथा ऐकून मी स्तब्ध झालो आहे. या क्षेत्रातील किती साऱ्या महिलांना लैंगिक शोषणाचे शिकार व्हावे लागले आहे आणि ही किती मोठी धाडसाची गोष्ट आहे की त्या स्वत: पुढे येऊन याबाबत आवाज उठवत आहेत. या प्रकरणात सर्वांचे म्हणणे आधी ऐकून घेतले पाहीजे, उगाच मत बनवायला नको. अक्षय कुमार यांनी चित्रीकरण थांबविण्याच्या घेतलेल्या निर्णयाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे. या प्रकरणाचा तपास व्हायलाच हवा.
तीन तरूणींनी निर्माता-दिग्दर्शक साजिद खानवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. यात अभिनेत्री सलोनी चोप्रा, रैचल वाइट व एका पत्रकार महिलेचाही समावेश आहे. यानंतर अक्षय कुमारने हाऊसफुल 4चे शूटिंग थांबवण्यात यावे अशी विनंती निर्मात्यांकडे ट्विटरवरून केली होती. कारण या सिनेमाचा दिग्दर्शन साजिद खान करतो आहे. लैंगिक अत्याचाराचे आरोप असणाऱ्यांसोबत मी काम करणार नाही अशी भूमिका अक्षयने घेतली आहे. यानंतर साजिदने या सिनेमाचे दिग्दर्शन न करण्याचा निर्णय घेतला. या सिनेमाचे चित्रीकरण जैसलमेरमध्ये सुरू होते. यानंतर या आरोपांनंतर साजिदची बहिण फराह खाननेही त्या महिलांना पाठिंबा दिला आहे. साजिद खानवर झालेल्या लैंगिक छळाच्या आरोपांनंतर त्याच्यावर चहुबाजुंनी टीका होतेय. साजिद खानवर अभिनेत्री सलोनी चोप्राने केलेल्या आरोपानंतर काही महिलांनी #MeToo मोहिमेत सहभागी होत छळाचा आरोप केलाय.अक्षयच्या निर्णयानंतर साजिद स्वत: दिग्दर्शन पदावरून स्वत:च बाजूला झाला. तसेच माझ्यावर करण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत असंही तो ट्विट करून म्हणाला होता.