तनुश्री दत्ता-नाना पाटेकर वादानंतर अनेक अभिनेत्रींनी, इंडस्ट्रीशी संबंधित महिलांनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक शोषणाच्या, गैरतर्वनाच्या प्रकरणांविरोधात मोहिम उघडली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत सिनेइंडस्ट्रीतील अशी प्रकरण समोर आली आहेत. या मोहिमेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अनेक महिला कलाकारांनी आपल्यावर घडलेल्या अन्यायाला वाचा फोडली आहे. नाना पाटेकर, विकास बहल, चेतन भगत, रजत कपूर, कैलाश खेर आणि आता आलोकनाथ यांसारख्या दिग्गजांवर #Me too अंतर्गत गैरवर्तन आणि असभ्य वर्तणुकीचे आरोप केले गेले आहेत. यामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर कलाकारांपासून सर्वजण रिअॅक्ट होत आहेत. या मोहिमेवर अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चन हिने प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तिने या मोहिमेचा प्रभाव चांगला पडत असल्याचे म्हटले आहे आणि महिलांच्या बाजूने बोलत राहणार असल्याचे सांगितले आहे.
एका वाहिनीशी बोलताना ऐश्वर्या राय -बच्चन म्हणाली की, माझे मत मी ठामपणे मांडत असते. अशा प्रकारच्या घटना दिर्घकाळापासून घडत आहेत. मात्र आत्तापर्यंत कुणी समोर येण्यास धजत नव्हते. या मोहिमेद्वारे स्त्रियांनी समोर येण्याची हिंमत दर्शविली आहे. या मोहिमेचा प्रभाव चांगला होताना दिसतोय. मी आधीही महिलांकडून बोलले आणि त्यांच्याकडूनच बोलत राहणार. सोशल मीडियाने स्त्रियांना बोलण्यासाठी सक्षम बनवले आहे. आज प्रत्येक महिलेचं मत ग्राह्य धरले गेले पाहीजे.' ऐश्वर्याने कुणावर निशाणा न साधता #Me Too मोहिम ही आजच्या काळाची गरज असल्याचेही म्हटले आहे.