एका महिला फोटो जर्नालिस्टने कैलाश खेरवर अशाच प्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. आपल्या अन्य एका महिला साथीदारासोबत ही महिला फोटोग्राफर कैलाश खेरची मुलाखत घ्यायला गेली होती, तेव्हाची ही घटना असल्याचा तिचा दावा आहे.‘कैलाश खेर आम्ही दोघींच्यामध्ये बसला होता आणि मुलाखत देताना सतत त्याचा हात आमच्या मांडीवर होता. कैलाशच्या मुलाखतीत या घटनेचाही उल्लेख कर, असे मी माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीला म्हटले होते. पण वृत्तपत्र या अँगलची बातमी छापणार नाही, असे तिचे म्हणणे होते,’ असे ट्विट या पीडित महिला फोटो जर्नलिस्टने केले होते. या सगळ्या प्रकरणावर आता कैलाश खेरने स्पष्टीकरण दिले आहे. हे आरोप ऐकून प्रचंड निराशा झाली. मी पाटण्यात होतो आणि मला माझ्यावरच्या या आरोपांबाबत कळले. ही घटना कधीची आहे, हे मला आठवत नाही. माझे स्वत:चे एक छोटे जग आहे आणि मी माझ्या या जगात बिझी असतो. पण तरिही कुणाला काही गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो. जे लोक मला ओळखतात, माझ्यासोबत ज्यांनी काम केले आहे, त्यांना मी माणुसकी किती जपतो, हे माहित आहे. मी महिलांचा प्रचंड आदर करतो. विशेषत: मीडियात काम करणाऱ्या महिलांचा. कारण त्यांचे काम किती कठीण आहे, हे मी जाणतो, असे कैलाश खेरने म्हटले आहे.
#MeToo: काही गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो; गैरवर्तनाच्या आरोपावर कैलाश खेरचा खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2018 11:40 AM