दरदिवशी चित्रपटसृष्टीतील कुणी ना कुणी #MeToo अंतर्गत आपल्यावर झालेल्या अन्याय आणि अत्याचारांना सोशल मीडिया किंवा माध्यमातून वाचा फोडत आहेत. या आरोपांनंतर चित्रपटृष्टीतलं वातावरण पूर्णपणे ढवळून गेले आहे. झालेल्या आरोपांमध्ये नवनवीन गौप्यस्फोट किंवा मग नवा आरोप यामुळे चित्रपटसृष्टीला जणू काही #MeToo ग्रहण लागल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावर #metoo च्या माध्यमातून अनेक अभिनेत्रींनी आपल्यासोबत झालेल्या अत्याचारांना वाचा फोडली होती. यांत अभिनेत्रींच्या यादीत आता आणखी एका अभिनेत्रीची भर पडली आहे. यात आता रेणुका शहाणे यांचेही नाव घ्यावे लागेल. एका वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत रेणुका शहाणे यांनीही आपलं मौन सोडलं आहे. प्रत्येक महिला अशा घटनेला एकादा तरी बळी पडली असणार. अशी कोणतीही महिला नाही जिला अशा प्रसंगाला समोरे जावे लागले नसणार. मी ही 'Metoo' प्रसंगाला बळी पडले आहे. यातून सावरायला मलाही दीर्घ काळ लागला. मलाही खूप त्रास सहन करावा लागला होता. metoo ही प्रत्येक दिवशी प्रत्येक महिलेची कहाणी आहे.
हिंदी चित्रपटसृष्टीत दिवसागणिक लैगिक अत्याचार आणि शोषणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिने अँड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सिंटाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या आरोपांच्या पार्श्वभूमीवर सिंटा एक महिलांची समिती गठीत करणार आहे. मुंबईत आयोजित एका पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली. या समितीमध्ये अभिनेत्री रवीना टंडन, रेणुका शहाणे, स्वरा भास्कर यांचा समावेश असेल. या तीन अभिनेत्रींसह दिग्दर्शक-अभिनेता अमोल गुप्ते, पत्रकार भारती दुबे, वकील वृंदा ग्रोवहर आणि मानसोपचारतज्ज्ञ यांचाही या समितीत समावेश असेल. या समितीबाबत चित्रपटसृष्टीतील दिग्गज व्यक्तींशी सल्लामसलत सुरू असल्याची माहिती सिंटाचे सरचिटणीस सुशांत सिंहने दिली आहे. लवकरच या समितीचे गठन करण्यात येणार आहे.