Join us

पुन्हा #MeToo; राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 5:15 PM

'संजू' चित्रपटाच्या सहाय्यक दिग्दर्शिकेचा गंभीर आरोप

मुंबई: प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानीवर लैंगिक शोषणाचा आरोप झाला आहे. संजू चित्रपटाच्या निर्मितीनंतर हा धक्कादायक प्रकार झाल्याचं पीडित महिलेनं म्हटलं आहे. हिरानीवर आरोप करणाऱ्या महिलेनं संजू चित्रपटाची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केलं आहे. राजकुमार हिरानीनं 6 महिन्यात (मार्च ते सप्टेंबर 2018) अनेकदा आपलं लैंगिक शोषण केल्याची व्यथा पीडित महिलेनं मांडली. संजू चित्रपटाच्या निर्मितीनंतर हा संपूर्ण प्रकार घडल्याचं तिनं सांगितलं. राजकुमार हिरानीनं केलेल्या कृत्याची माहिती पीडित महिलेनं संजूचे सहनिर्माते विधू विनोद चोप्रा यांना मेलद्वारे दिली. याशिवाय विधू यांची पत्नी अनुपमा चोप्रा, कथा लेखक अभिजात जोशी, विधू यांची बहीण आणि संचालिका शेली चोप्रा यांनादेखील तिनं मेल केला आहे. याप्रकरणी राजकुमार हिरानीच्या वकिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. हिरानी यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं वकील आनंद देसाई यांनी म्हटलं आहे. 'हिरानी यांच्यावरील सर्व आरोप तथ्यहीन आहेत. त्यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी रचलेलं हे षडयंत्र आहे,' अशी प्रतिक्रिया देसाई यांनी 'हफिंग्टन पोस्ट' या इंग्रजी संकेतस्थळाला दिली. 'राजकुमार हिरानीनं 9 एप्रिल 2018 ला अश्लिल शेरेबाजी केली. त्यानंतर त्यांनी त्यांच्या घरी आणि कार्यालयात जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी माझ्याकडे गप्प राहण्याशिवाय कोणताही पर्याय नव्हता. जेव्हापर्यंत मी शांत राहू शकत होते, तोपर्यंत गप्प बसले. कारण त्यावेळी मला नोकरी टिकवायची होती. मी त्यावेळी काही बोलले असते, तर माझं काम वाईट आहे, असं हिरानी यांनी सर्वांना सांगितलं असतं. त्यामुळे माझं भविष्य उद्ध्वस्त झालं असतं,' अशी व्यथा पीडितेनं मेलमधून मांडली आहे. 

टॅग्स :राजकुमार हिरानीसंजू चित्रपट 2018बॉलिवूडलैंगिक छळ