नाना पाटेकर, रजत कपूर, विकास बहल, आलोक नाथ यांच्यानंतर आपल्या वादग्रस्त वक्त्व्यांनी कायम वाद ओढवून घेणारा बॉलिवूड गायक अभिजीत भट्टाचार्यही गैरवर्तनाच्या आरोपात अडकला आहे. होय, एका गायिकने मी टू चळवळीअंतर्गत अभिजीतवर गंभीर आरोप केले आहेत.सोबत डान्स करायला नकार दिल्याने चिडलेल्या अभिजीतने आपल्यासोबत गैरवर्तन करत अपशब्द वापरले होते, असे सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये या गायिकेने म्हटले आहे.
‘अभिजीत माझी मैत्रिण शिरीनचा मित्र होता. मला शिरीनने अभिजीतला एक निरोप द्यायला सांगितला. मी थोड्या वेळात लॉबीमध्ये येते, असा शिरीनचा निरोप घेऊन मी अभिजीतकडे गेले होते. अभिजीतला हा निरोप देऊन मी डान्स फ्लोरकडे वळले आणि त्याचक्षणी इन हाऊस डीजेने शानदार म्युझिक सुरू केले. दुस-याचक्षणी अभिजीत माझ्या जवळ येऊन डान्स करू लागला. मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आरशात बघून डान्स करू लागले. काही मिनिटांनंतर आम्ही तिथून निघालो आणि अॅण्टीक्लॉककडे जायला लागलो. अभिजीतने तिथेही माझा पाठलाग केला. केवळ इतकेच नाही तर मी त्याच्यासोबत डान्स नकार दिला म्हणून त्याने माझे मनगट धरले आणि मला जोराने स्वत:कडे खेचले. तू स्वत:ला काय समजतेस, थांब मी तुला धडा शिकवतो, असे माझ्या कानात ओरडत तो बळजबरीने माझ्या डाव्या कानाला किस करू लागला. मी त्याला मागे ढकलले आणि तिथून पळून डीजे कंसोलकडे गेले. मी म्युझिक बंद करायला लावले आणि हॉटेल स्टाफला याबद्दल सांगितले. त्यांनी अभिजीतला १ महिन्यासाठी हॉटेलमध्ये येण्यास बंदी घातली. एशियन एजने माझी ही स्टोरी केली होती आणि पहिल्या पानावर छापली होती, ’असे या गायिकेने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. ही घटना १९९८च्या कोलकाता अॅण्टी क्लॉक नाईट क्लब हॉटेलमधील असल्याचे तिने म्हटले आहे.अद्याप अभिजीतने याबद्दल काहीही खुलासा केलेला नाही.