मीटू मोहिमेअंतर्गत बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांचा खरा चेहरा जगासमोर आला आहे. यात नाना पाटेकर, साजिद खान, विकास बहल, सुभाष घई व आलोकनाथ या कलाकारांची नावे समोर आली आहेत. सिनेजगतातील कलाकारांवर आरोप लागल्यानंतर सिने अॅण्ड टेलिव्हिजन आर्टिस्ट असोसिएशन म्हणजेच सिंटाने पीडित महिलांना पाठिंबा दिला आहे. तसेच सिंटाने आरोप केलेल्या व्यक्तींना नोटीस पाठवून उत्तर मागवले होते. या मुद्द्याला घेऊन सिंटाने नुकतीच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत सिंटाने सांगितले की, लैंगिक शोषणाच्या प्रकरणांसाठी नवीन कमिटी बनवली आहे. या कमिटीमध्ये रवीना टंडन, रेणुका शहाणे, अमोल गुप्ते यांच्यासहित यात इतर सदस्य आहेत. त्यासोबतच स्वरा भास्करसोबत आणखीन एक सबकमिटी बनवली जाणार आहे. पीडित व्यक्तीला प्लॅटफॉर्म मिळावा व यामाध्यमातून आपली गोष्ट सांगता यावी, या उद्देशाने ही कमिटी बनवण्यात आली आहे.
या पत्रकार परिषदेत सिंटाचा सचिव सुशांत सिंग म्हणाला की, काही दिग्गज सेलिब्रेटी माझ्यावर नाराज आहेत कारण मी या मुद्द्यावर आपली प्रतिक्रिया दिली. मी माझ्या मतांवर समाधानी आहे. लोक कॉम्प्रोमाइज करायला तयार होतात. मात्र आता संघटना चांगले कास्टिंग डिरेक्टर व अजेंसी असावेत यासाठी प्रयत्न करणार आहे. मीटूची कथा प्रत्येक इंडस्ट्रीत आहे. आपण आतापर्यंत या मुद्द्याकडे दुर्लक्ष करत आलो आहोत. मी मीटू मोहिमेचा आभारी आहे. आपल्याला सतर्क राहण्याची गरज आहे. फेक अकाउंटच्या माध्यमातून मीटू मोहिमेला खराब करण्याचा प्रयत्न सुरू आहे. खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. माझी प्रसारमाध्यमांना विनंती आहे की त्यांनी एकतर्फी कथेवर विश्वास ठेवू नये आणि प्रत्येकाला एकाच तराजूत तोलू नका.