एका फोटो जर्नलिस्टने गायक कैलाश खेरवर गैरवर्तनाचा आरोप केला होता. ‘एका मुलाखतीदरम्यान कैलाश खेर माझ्या आणि माझ्या जर्नलिस्ट मैत्रिणीच्या मध्ये बसला होता व त्याचे हात सारखे आमच्या मांड्यांवरून फिरत होते,’ असा खुलासा या फोटो जर्नलिस्टने केला होता. या आरोपावर कैलाश खेर यांने खुलासाही केला होता. हे प्रकरण केव्हाचे आहे, मला आठवत नाही़ काही गैरसमज झाले असतील तर मी माफी मागतो, असे तो म्हणाला होता. केवळ इतकेच नाही तर माझ्यासोबत काम करणाºया लोकांना मी कसा आहे, हे ठाऊक आहे, असा छातीठोक दावाही त्याने केला होता. पण हे प्रकरण इथेच संपलेले नाही. कारण आता सुप्रसिद्ध गायिका सोना मोहपात्रा हिने कैलाश खेरवर गंभीर आरोप केले आहेत.
‘मीटू’ चळवळीअंतर्गत सोनाने ट्विटरवर एकापाठोपाठ एक असे अनेक ट्विट करत कैलाश खेरचा खरा चेहरा जगापुढे आणला आहे. ‘या व्यक्तिने माझा फायदा उठवण्याचे प्रयत्न केलेत. याचा अर्थ त्याच्यासाठी हे नवे नाही. मी दाव्यानिशी सांगू शकते की, त्याने केवळ त्या दोन महिलांसोबतचं नाही तर अशा कितीतरी महिलांसोबत गैरवर्तन केले असेल. त्याच्या निर्लज्जपणाचा कळस म्हणजे, हा व्यक्ति स्वत:ला संगीताचा भोक्ता असल्याचे सांगतो. साधा-भोळा असल्याची बतावणी करतो. विसरण्याचा आजार असल्याचे सांगतो,’असे सोना मोहपात्राने लिहिले आहे. स्वत:सोबतचा एक प्रसंगही तिने सांगितला आहे.
‘एका कॉन्सर्टच्या निमित्ताने मी कैलाशला पृथ्वी कॅफेमध्ये भेटले होते. आमच्या बँडने ताल धरला होता आणि नेहमीप्रमाणे कैलाशचा हात माझ्या मांडीवर होता. हात तसाच ठेवत, तू खूप सुंदर आहेस. बरे झाले तू कुण्या अभिनेत्याला न भेटता, एका सिंगरला(सोनाचा पती रामला उद्देशून) भेटलीस, असे तो मला म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकून मी लगेच तिथून निघून गेले, असे सोना मोहपात्राने लिहिले आहे.