अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्यामुळे बॉलिवूडमध्ये ‘मीटू’ मोहिमेने जोर धरला आहे आणि आता तनुश्री कुठल्याही स्थितीत मागे हटायला तयार नाही. गैरवर्तनाप्रकरणी नाना पाटेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तनुश्रीने दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची तयारी चालवली असल्याचे वृत्त आहे. विवेक अग्निहोत्रीने आपला गुन्हा मान्य केल्यानंतर तनुश्रीने त्याच्याविरोधात तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतल्याचे कळतेय.तनुश्रीचे वकील नितीन सातपुते यांनी याबाबतचे संकेत दिले. विवेक अग्निहोत्रीने आपल्या १० पानांच्या नोटीसमध्ये आपला गुन्हा मान्य केला आहे, असा दावा नितीन सातपुते यांनी केला.एका वृत्तपत्राशी बोलताना नितीन सातपुते म्हणाले की, माझ्या अशिलाने (तनुश्री) तिच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये विवेक अग्निहोत्रीवर कुठलेही आरोप केले नव्हते. विवेकने तनुश्रीला १० पानांचे जे नोटीस पाठवले, त्यात त्यांनी ‘तो डायरेक्टर दुसरा कुणी नाही तर मी स्वत: आहे,’ असे म्हटले आहे. विवेक अग्निहोत्रीने स्वत:च हे मान्य केल्याने तनुश्री अग्निहोत्रीविरोधात एफआयआर दाखल करणार.तनुश्रीने डीएनएला दिलेल्या मुलाखतीत विवेक अग्निहोत्रीवर आरोप केले होते. ‘चॉकलेट- अ डिप डार्क सिक्रेट’ या चित्रपटाच्या शूटींगवेळी विवेक अग्निहोत्रीने आपल्याला संपूर्ण कपडे उतरवून डान्स करण्यास सांगितले. मी संबंधित दृश्यात नसतानाही त्याने मला हा टेक देण्याची सूचना केली. त्यावेळी इरफान खान आणि सुनील शेट्टी सेटवर होते. त्यांनी माझा बचाव केला. इरफान आणि सुनील यांच्यासारख्या कलाकारांमुळेच मी इंडस्ट्रीत टिकून होते. मात्र २००८ मध्ये ‘हॉर्न ओके प्लीज’च्या सेटवर माझ्यासोबत जे काही घडले, त्यामुळे मी इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला, असे तनुश्रीने म्हटले होते.तनुश्रीच्या या आरोपानंतर विवेक अग्निहोत्रीने तिला कायदेशीर नोटीस पाठवले होते.
Tanushree Dutta controversy: विवेक अग्निहोत्रीने मान्य केला गुन्हा! आता तनुश्री दत्ता दाखल करणार एफआयआर!!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 4:31 PM