अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi ) ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणानं चर्चेत येत असते. परखड मत मांडणारी, मनात येईल ते बेधडक बोलणारी अशी तिची ओळख आहे. यामुळे अनेकदा हेमांगी कवी सोशल मीडियावर ट्रोलही होते. सध्या तिची एक पोस्ट चर्चेत आहे. नुकताच हेमांगीने तिचा वाढदिवस साजरा केला. यंदाच्या वाढदिवसानिमित्त ती ताज हॉटेलमध्ये गेली होती. तिथला अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.
हेमांगी कवीने लिहिले की, बालपणापासून वाटायचं 'साला एकदा तरी ताज हॉटेलमध्ये जाऊन चहा पिऊन यायचंय यार! ४१ वर्ष मुंबईत राहून ही कधी ताज हॉटेलमध्ये जायची हिंमत नाही झाली. कारण इच्छा असली तरी आपण पडलो टिपिकल मध्यम वर्गीय आणि मध्यम वर्गीय माणसाला हिंमत गोळा करायला बराच काळ जावा लागतो. मी आजही मध्यम वर्गीयच आहे. घर, गाडी, घरात एसी, बिल्डिंगला लिफ्ट, २४ तास पाणी, वीज, गाठीला थोडा पैसा! ही सगळी साधनं परिस्थिती 'आता सुधारलीये बरं' म्हणायला पुरेशी असली तरी मिडल क्लास मेटेंलिटी, मध्यम वर्गीय 'मानसिकता' गळून पाडेल याची शाश्वती देत नाहीत! माझं कॉलेज ऐन मुंबईतलं, सर जे.जे. स्कूल ऑफ फाईन आर्ट्स गेटवे ऑफ इंडिया जवळचं! तिथंच मागे उभं असलेलं आणि लहानपणी कुठेतरी चित्रात ब्लॅक अँड व्हाइटमध्ये पाहिलेलं हॉटेल ताज! भव्य दिव्य! बाहेरून बिल्डिंग इतकी कमाल दिसायची पण साला आत जायची भीती! आत सोडलं नाही तर, हाकलून दिलं तर, अपमान केला तर? आणि समजा गेलोच आत तर २५०/३०० रुपयांचा फक्त चहा? बाप रे नको! मग ताजकडे पाठ करत, समुद्राकडे बघत, हातात अडीच रुपयांच्या कटिंगच्या चहावर फुंकर मारत आधीच थंड असलेल्या परिस्थितीला अजून गार करत "ह्या , हे आपलं काम नव्हे" चे घोट प्यायचो!
तिने म्हटले की, नवरा अनेक वेळा म्हणालाय, "अगं जाऊन तर बघू ताज मध्ये" आणि मी म्हणायचे, “नको कशाला? त्या २५० रुपयात तिथल्या पेक्ष्या भारी आणि १०० वेळा चहा बनवून देईन तुला!" Typical middle class! हा confidence २००७ साली पहिल्यांदा जेव्हा त्याने मला पिझ्झा खाऊ घातला तेव्हा नव्हता कारण चहा बनवण्यात आणि पिझ्झा बनवण्यात फरक असतो! तर काल हट्टाने तो मला वाढदिवसानिमित्त हॉटेल ताज मध्ये घेऊन गेला! ४१ वर्षात पहिल्यांदा हॉटेल ताज मध्ये शिरले! बाहेरून पूर्णपणे उंची लोकांचा 'पेहराव' पण मनात... मिडल क्लास 'इधर ही ठेहेर जाव'! …..