कोरोना लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूदने हजारो स्थलांतरित मजूरांना त्यांच्या घरी पोहोचवले. बस, ट्रेन व अन्य वाहनांनी सुमारे 25 हजारांवर लोकांना त्याने सुरक्षित घरीच पोहोचवले नाही तर रस्त्यात त्यांच्या खाण्यापिण्याचीही व्यवस्था केली. त्या कळीण सोनू जणू देवदूताच्या रूपात मजूरांसाठी धावून आला होता. यापैकीच एका मजुराने सोनूचे आभार मानले आहेत. त्याचे नाव प्रशांत कुमार. ओडिसाच्या केंद्रपाडा येथे राहणा-या प्रशांत कुमारने आता एक वेल्डिंग वर्कशॉप उभारले आहे आणि या वर्कशॉपला त्याने सोनू सूदचे नाव दिले आहे.
32 वर्षांचा प्रशांत कोच्ची एअरपोर्टजवळ एका कंपनीत प्लम्बरचे काम करायचा. लॉकडाऊनमुळे कंपनीने त्याला कामावरून कमी केले आणि प्रशांत अक्षरश: रस्त्यावर आला. हातचे होते नव्हते तेवढे पैसे संपले. घरी परतण्याशिवाय दुसरा मार्ग नव्हता. प्रशांतने श्रमिक स्पेशल ट्रेनमध्ये जागा मिळवण्याचे अनेक प्रयत्न केलेत. पण त्याला जागा मिळाली नाही. अशावेळी सोनू सूद त्याच्या मदतीला धावला. 29 मे रोजी सोनूने स्पेशल फ्लाईटद्वारे प्रशांतला त्याच्या ओडिसाच्या घरी पोहोचवले.
घरी गेल्यानंतर पोटापाण्यासाठी काहीतरी करावे लागणार होते. प्रशांतने वेल्डिंग वर्कशॉप उघडण्याचा निर्णय घेतला. या वर्कशॉपला देवासारखा मदतीला धावणा-या सोनू सूदचे नाव द्यायचे हे त्याने आधीच ठरवले होते. त्याने सोनूला त्याचे नाव व फोटो वापरण्याची परवानगी मागितले.
सोनू याबद्दल सांगतो, प्रशांतने मला त्याच्या माझे दुकानाला नाव देण्याची व माझा फोटो वापरण्याची परवानगी मागितली होती. मी क्षणाचाही विचार न करता त्याला परवानगी दिली. याआधी मी अनेक बँ्रडच्या जाहिराती केल्या. पण एका मजुराच्या दुकानाला माझे नाव देण्याची गोष्ट माझ्या मनाला भावली. मी जेव्हा केव्हा ओडिशात जाईल तेव्हा प्रशांतच्या दुकानाला नक्की भेट देईन.