आपल्या वक्तव्यांमुळे सतत चर्चेत राहणारा, एक ना अनेक वाद ओढवून घेणारा बॉलिवूडचा स्वयंभू समीक्षक कमाल आर. खान अर्थात केआरकेने (KRK) अलीकडे सलमान खानसोबत (Salman Khan) पंगा घेतला. नुकताच सलमानने त्याच्याविरोधात मानहानी दावा दाखल केला. आता या वादात गायक मिका सिंगची (Mika Singh) एन्ट्री झाली आहे. त्याने केआरकेला तिखट शब्दांत उत्तर दिले आहे.सोशल मीडियावर एक चाहत्याच्या ट्विटला उत्तर देताना मिकाने केआरकेला थेट आव्हान दिले. ‘हा (केआरके) फक्त बॉलिवूडच्या सभ्य, लोकप्रिय लोकांशी पंगा घेतो, बाप लोकांशी नाही. मी करण जोहर वा अनुराग कश्यप नाही, मी याचा बाप आहे,’ असे मिकाने ट्विटमध्ये म्हटले आहे.
शनिवारी एका मुलाखतीतही मिका केआरकेवर बरसला होता. सलमान खानने केआरकेवर मानहानीचा दावा ठोकून अगदी योग्य तेच केले. त्याने मला डिवचून बघावे. माझ्याकडून केस वगैरे होणार नाही. थेट थप्पड पडेन. केआरके इतका मोठा उंदीर आहे की तो आपल्या बिळाबाहेर निघणार नाही. कारण त्याला माहितीये, बाहेर येताच त्याला थप्पड पडणार आहेत, असे मीका म्हणाला होता.
मिकाला म्हटले ‘चिरकूट सिंगर’मिकाच्या या मुलाखतीनंतर केआरके शांत कसा राहणार होता? त्याने मिकाला ट्विट करत उत्तर दिले होते. ‘आता या प्रकरणात पब्लिसिटी मिळवण्यासाठी एक चिरकुट सिंगरने उडी घेतली आहे. पण मी त्याला ही संधी देणार नाही़ जितक्या उड्या मारायच्या तितक्या मार. मी तुला अजिबात भाव देणार नाही, कारण तेवढी तुझी लायकीच नाही,’ असे ट्विट केआरकेने केले होते. अर्थात आपल्या ट्विटमध्ये त्याने मिकाचे नाव घेणे टाळले होते.
केआरकेने ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सलमानच्या ‘राधे-योर मोस्ट वॉन्टेड भाई’ या सिनेमाची प्रचंड खिल्ली उडवली होती. हा सिनेमा पाहून माझी तब्येत बिघडली, असे त्याने या सिनेमाचा रिव्ह्यू देताना म्हटले होते. राधे म्हणजे कोरोनाची तिसरी लाट आहे, असेही तो म्हणाला होता.
म्हणून ठोकला मानहानीचा दावा‘राधे’चा खराब रिव्ह्यू दिल्यामुळे सलमानने आपल्यावर मानहानीचा दावा ठोकल्याचे केआरकेने म्हटले होते. मात्र सलमानच्या वकीलांनी काल गुरूवारी याबाबत खुलासा करत, मानहानीचा दावा व राधेच्या रिव्ह्यूचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते. या मानहानी दाव्याचे कारण राधेचा रिव्ह्यू असल्याचे सांगितले जातेय. पण त्या रिव्ह्यूशी या दाव्याचा काहीही संबंध नाही. केआरके सलमानच्या बीइंग ह्युमन ब्रँडला सतत बदनाम करण्याचे प्रयत्न करतोय. त्यामुळे त्याच्याविरोधात मानहानी दावा ठोकण्यात आल्याचे वकीलाने स्पष्ट केले होते.